वृत्तसंस्था
Jul 20,2011 04:13:13 AM ISTकराची. कराची शहरावर दैनंदिन टेहळणी करणारे नौदलाचे विमान मंगळवारी येथील राष्ट्रीय तेल रिफायनरी प्रकल्पात कोसळून खाक झाले. यात सुदैवाने कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, एका पक्ष्याने टक्कर दिल्यामुळे हे विमान कोसळले असल्याचे कारण सांगितले जात आहे.
हे विमान नेहमीपेक्षा कमी उंचीवरून उडत होते. त्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. कोरंगी या भागात ही रिफायनरी असून हा सरकारचा उपक्रम आहे. हे विमान आपल्या रोजच्या टेहळणीसाठी निघाले असतानाच ही घटना घडली. हे विमान घटनास्थळी कोसळल्यानंतरही बराच वेळ आग सुरूच होती. या विमानाचा वापर फोटोग्राफी व टेहळणी या उद्देशातून केला जातो. या घटनेमुळे मालमत्ता किंवा प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना येथील प्रवेशाला मज्जाव केला आहे. दुसरीकडे मे महिन्यात कराचीतील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात दहा सैनिकांचा बळी गेला होता. त्या घटनेपासून देशातील सर्वात मोठ्या शहरातील सुरक्षा वाढवण्यात आली होती.