आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack Is Anti Islamic Behavior, Afghan Taliban Condemned

तौबा, हे तर इस्लामविरोधी कृत्य, अफगाण तालिबानचा तीव्र शब्दांत निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - पाकिस्तानमध्ये निष्पाप मुलांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शेजारील अफगाणिस्तानातील तालिबान संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला. एवढेच नव्हे, तर हा हल्ला म्हणजे इस्लामच्या विरोधातील कृती असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारच्या हल्ल्यात १४१ शालेय मुलांना दहशतवाद्यांनी अमानुषपणे ठार केले.

देशाने मंगळवारी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) केलेल्या हल्ल्यात रक्तलांछित असा काळा दिवस अनुभवला. पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये शेकडो मुलांना ओलीस ठेवून दहशतवादी आणि लष्करी जवान यांच्यात सुमारे आठ तास चकमक सुरू होती. त्याच संघटनेच्या अफगाण तालिबान गटाने मात्र हल्ल्याचा निषेध केला. मुले आणि निष्पाप लोकांची हत्या आम्ही कदापिही स्वीकारू शकत नाहीत. लहान मुले, महिला यांची हेतूपूर्ण हत्या करणे हे कृत्य इस्लामच्या तत्त्वाच्या विरोधातील आहे. प्रत्येक इस्लामिक सरकार आणि चळवळींनी हे मूलभूत तत्त्व विसरता कामा नये. इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान असे तालिबानचे ऑफिशियल नाव आहे. एरवी निष्पाप नागरिकांना आपले लक्ष्य करणा-या संघटनेने या हल्ल्यानंतर मात्र साळसूदपणा दाखवला आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाइकांच्या दु:खात सहभागी असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, काबूलमधील फ्रेंच सांस्कृतिक केंद्रावरील हल्ल्याची जबाबदारी संघटनेने घेतली. गेल्या आठवड्यातील हल्ल्यात एक ठार, १५ जखमी झाले होते.