मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात काही गुंडांनी एका भारतीय विद्यार्थ्यास लाठय़ाकाठय़ांनी जबर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार असून तो कोमात गेला आहे. मानराजविंदर सिंग असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी सांगितले की, मानराजविंदर (20) हा रविवारी नोबेल पार्कजवळ फुटपाथवर त्याच्या दोन मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. तेव्हा आठ लुटारूंनी त्यांना घेरले. हे सर्वजण आफ्रिकन नागरिक वाटत होते. त्यांनी मानराजविंदरला बराच काळ मारहाण केली. त्याच्याकडील मोबाइल व अन्य वस्तू घेऊन हे गुंड पळून गेले. या मारहाणीत मानराजविंदर तसेच त्याचा मित्र राजविंदरला गंभीर दुखापत झाली आहे. पैकी मानराजविंदरची प्रकृती गंभीर असून तो कोमात आहे. एक मित्र पळून गेल्याने बचावला. मानराजविंदर अकाउंटचे शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भारतातून आला फोन
मानराजविंदरचा भाऊ यानविंदर याने सांगितले की तो गेल्या सात वर्षांपासून ऑस्ट्रेलियात आहे. त्याच्या काकांनी भारतातून फोनवर त्याला मानराजविंदरवर हल्ला झाल्याची बातमी दिली. भारतीय दूतावासातून मानराजविंदरच्या घरी हल्ला झाल्याची व त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. यानविंदरने या प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित पकडण्याची व त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.