आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क वर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राचा हल्ला :व्हिडिओ यूट्यूबवरील पराक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - कोणत्याही क्षणी अणुचाचणी करण्याची शक्यता असलेल्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर आगडोंबात बुडालेल्या अमेरिकेतील एका शहराचा व्हिडिओ यूट्यूबर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले शहर न्यूयॉर्क शहराशी मिळतेजुळते आहे. उत्तर कोरियाने पोस्ट केलेल्या हल्ल्याच्या रंगीत तालमीच्या या व्हिडिओमुळे जगाच्या चिंतेत भर पडली आहे. माध्यमांना बातम्या पुरवणा-या उत्तर कोरियाच्या युरिमिन्झोक्किरी या सरकारी वेबसाइटने यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील शहरावरील क्षेपणास्त्र हल्ल्याचे कल्पनाचित्र रंगवण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये चाचणी घेतलेल्या रॉकेटसारख्याच अंतराळ यानामध्ये एक उत्तर कोरियन तरुण बसल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘वुई आर द वर्ल्ड’ या संगीत धूनचे व्हिडिओमध्ये पार्श्वसंगीत वाजवण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकत असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि अन्य गगनचुंबी इमारती दिसणा-या एका शहरावर फोकस केंद्रित होतो आणि अचानक क्षेपणास्त्र हल्ला होऊन आगडोंबात हे शहर उद्ध्वस्त होऊन जाते.

अमेरिकेवर काळे ढग घोंघावतात...
व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर ‘अमेरिकेत कुठे तरी धुराचे काळे ढग घोंघावत आहेत’ अशी ओळ स्क्रीनवर येते. ‘सैतानाचे घर त्यानेच पोसलेल्या भक्ष्यस्थानी पडले आहे...’ अशी दुसरी ओळ लगेच स्क्रीनवर येते.
माझे स्वप्न सत्य ठरणारच...
साम्राज्यवाद्यांनी आम्हाला कितीही एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला तरी अंतिम विजयाकडे लोकांची घोडदौड कुणीही रोखू शकणार नाही. माझे स्वप्न वास्तवात उतरणार आहे, असे अंतराळ यानात बसलेला तरुण कोरियन म्हणतो आणि हा व्हिडिओ संपतो.

अणुचाचणी घेतल्यास गंभीर शिक्षा
उत्तर कोरियाने अणुचाचणी घेतलीच तर त्याला कडक शासन केले जाईल, या मुद्द्यावर अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि दक्षिण कोरियात मंगळवारी एकमत झाले. उत्तर कोरियाने डिसेंबरमध्ये प्रतिबंधित क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची चाचणी घेतल्यामुळे निर्बंध लादण्यात येऊनही तिसरी अणुचाचणी घेण्याची तयारी 2006 पासून करण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये लादलेल्या कडक निर्बंधांच्या निषेधार्थ आपण चाचणी घेणारच असल्याची घोषणा उत्तर कोरियाने केली आहे. केरी आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री किम संग हॉन यांच्या दूरध्वनीवर झालेल्या संभाषणात डेमॉक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑ फ कोरियाने (डीपीआरके) प्रक्षोभक वर्तन सुरूच ठेवले तर त्याला कडक शासन केले जाईल, यावर एकमत झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नुलंड यांनी सांगितले.