आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Australian Election Rivals Rudd And Abbott Hold First Debate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियात समलैंगिक विवाह निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केव्हिन रूड यांनी पुन्हा सत्तेवर आल्यास समलैंगिक विवाहाचे विधेयक मंजूर करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे देशाच्या निवडणूक प्रचारात ‘गे मॅरेज’ हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे संकेत रूड यांच्या वक्तव्यावरून मिळाले आहेत.

देशात 7 सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सत्ताधारी लेबर पार्टीला जनतेने कौल दिला, तर शंभर दिवसांच्या आत अशा प्रकारचा विषय संसदेत मंजूर करून घेण्यात येईल, असे रूड यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर जाहीरपणे ग्वाही देणारे रूड हे देशातील पहिलेच नेते आहेत. समलैंगिक विवाहावर देशात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु आता चर्चा थांबवून काही तरी करण्याची वेळ आली आहे. एकूणच या विषयावर मी देखील अनेक दिवसांपासून चिंतन करत होतो. खरोखरच ही एक कठीण चर्चा आहे. त्यावर लेबर पार्टीच्या सदस्यांनी विचारपूर्वक आपला पाठिंबा द्यायचा आहे. आपण कोणावरही दडपण आणू इच्छित नाहीत. परंतु ऑस्ट्रेलियातील सर्व जनतेची एकता आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरते. प्रत्येकाला आनंद मिळवण्याचा हक्क आहे. त्यामुळेच देशांतील नागरिकांचे परस्परांवरील प्रेम जास्त महत्त्वाचे आहे, असे रूड यांनी म्हटले आहे.

पूर्वी विरोधात : रूड यांच्या लेबर पार्टीने डिसेंबर 2011 मध्ये या भूमिका बदलली होती. पक्षाने या मुद्द्याचे समर्थन केले होते. परंतु त्यावेळी रूड व ज्युलिया गिलार्ड यांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता रूड यांनी पुन्हा पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

संघटना अनेक
ऑस्ट्रेलियात समलैंगिक समुदायाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक संघटना आहेत. परंतु देशातील विवाहाचा मुद्दा कायद्याच्या अंतर्गत येतो. त्यामुळे या संघटनांच्या कार्याला कायद्याचा आधार नाही.

रूड यांनाच प्राधान्य
विद्यमान पंतप्रधान केव्हिन रूड यांच्याकडेच देशाची सूत्रे असावीत, असे मत देशातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या लोकप्रियतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी विरोधी पक्षनेते टोनी अबॉट यांच्या तुलनेने नागरिकांनी त्यांना प्राधान्य दिले आहे. रूड यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीची दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे.

माजी कसोटीपटू रिंगणात
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कसोटीपटू नथान ब्रॅकन निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. डॉबेल (उत्तर) मतदारसंघातून ते उमेदवारी दाखल करणार आहेत. केवळ मागे बसून काही प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे पुढे येऊनच समस्यांची उकल करावी लागेल, असे ब्रॅकन यांनी ट्विट केले आहे.