आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर बगदादच्या जवळ; अमेरिका इराकच्या मदतीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरकूक- सुन्नी मुस्लिमांच्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लॅव्हंट (आयएसआयएल) गटाच्या दहशतवाद्यांनी निनेवेह, किरकूक आणि सलाहेदीन प्रांतासह मोसूल शहरावर वर्चस्व मिळवल्यानंतर त्यांनी बगदादवर नियंत्रण मिळवण्याचा मनुसबा आखला आहे. इराकच्या ढासळलेल्या सुरक्षा स्थितीत बगदादला वाचवण्यासाठी अमेरिका दहशवतवाद्यांविरुद्ध हवाई हल्ले करण्याच्या विचारात आहे. दरम्यान, अमेरिकी फौजांच्या माघारीनंतर उद्भवलेल्या स्थितीत आणीबाणी लागू करण्याबाबत पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

आयएसआयएलच्या बंडखोरांनी सोमवारी रात्री सरकारविरोधात युद्ध पुकारले. उत्तरेतील निनेवेह, किरकूक आणि सलाहेदीनमध्ये त्यांनी हल्ले चढवले. येथून 90 कि.मी. अंतरावरील धुलियाह शहर ताब्यात घेतल्यानंतर मुतास्सम प्रदेशही पडला आहे. शिया पंथीयांची धार्मिक स्थळे असलेल्या बगदाद आणि करबला शहरांच्या दिशेने कूच करणार असल्याचा निर्धार आयएसआयएलचा प्रवक्ता अबू मोहंमद अल अदनानीने व्यक्त केला आहे.

फल्लुजाहपासून सुरुवात
बगदादच्या पश्चिमेकडील फल्लुजाह भागावर दहशतवाद्यांनी या वर्षाच्या सुरुवातीस नियंत्रण मिळवले. तेव्हापासून सरकारची पकड ढिली झाली आहे. दरम्यान, सध्याच्या स्थितीत अमेरिकेने इराकला आवश्यक सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये त्यांनी ड्रोन हल्ल्याचाही पर्याय खुला ठेवला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि येमेनमध्ये वापरलेल्या रणनीतीचा उपयोग येथे होऊ शकतो.

अमेरिका, ब्रिटनच्या फौजा तूर्त नाही
आयएसआयएल विरोधातील एकत्रित रणनीतीस इराक सरकार आणि नेत्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र, इराकमध्ये आताच फौजा पाठवण्याचा कोणताही विचार नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी दिली. त्याचबरोबर इराकमध्ये ब्रिटिश लष्कर पाठवण्याचा कोणताही विचार नसल्याचे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विल्यम हेग यांनी सांगितले.

मोसूल येथील रहिवासी जवळच्याच खाजीर शहरातील निर्वासितांच्या छावणीत आर्शयासाठी धाव घेत आहेत.बुधवारी जीव मुठीत धरून चाललेले एक कुटुंब.

​आयएसआयएल गटाचे स्वरूप : इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लॅव्हंट हा इराक आणि सिरियामध्ये सक्रिय असलेला दहशवादी गट आहे. इराक आणि सिरियाच्या काही भागात त्यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र राज्य अस्तित्वात असल्याचा त्यांचा दावा आहे. सुरुवातीस अल कायदासोबत काम करणारा गट गेल्या आठ महिन्यांपासून स्वतंत्र काम करतो. इराक युद्धाच्या सुरुवातीच्या काळात त्याची स्थापना झाली. इराकमधील सुन्नीबहुल भागात खलिफा स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

अधिवेशन बोलावले
दरम्यान, पंतप्रधान नूरीअल मलिकी आणि राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने आणीबाणीबाबत विचार करण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलावले आहे. आणीबाणी लागू करण्यासाठी सत्ताधार्‍यांना दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. मात्र, मतविभाजनामुळे आणीबाणीचा प्रस्ताव मंजूर होणे कठीण मानले जाते.

लष्कराचा प्रतिकार कमी
बंडखोरांच्या लढय़ाला सुरक्षा जवानांकडून कमी प्रतिकार केला जात आहे. अनेक जवानांनी आपली वर्दी उतरवली आहे. बुधवारी मोसूल शहर अतिरेक्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पाच लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. दिवंगत राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांचे मूळ गाव तिक्रीत तसेच सलाहेदीन बंडखोरांच्या ताब्यात आहे.