आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Terrorist Group, Pakistan Government Decision Before Obama Visit To India

जेयूडी, ‘हक्कानी’या दहशतवादी गटांवर बंदी, ओबामांच्या भारत दौ-याआधी पाक सरकारचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अमेरिकेचा वाढता दबाव आणि बराक ओबामांच्या भारत दौ-यादरम्यान हल्ल्यास झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानला अखेर दहशतवादविरोधी धोरणात बदल करणे भाग पडले आहे. पाकिस्तानने जमात-उद-दावा (जेयूडी) आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी गटांना प्रतिबंधित संघटनेच्या यादीत टाकले आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद जेयूडीचा म्होरक्या आहे.

पाकिस्तानी तालिबान्यांनी पेशावरच्या लष्करी शाळेत केलेल्या हल्ल्यात १५० जण ठार झाले होते. दहशतवाद्यांविरुद्ध कडक पाऊल उचलण्यासाठी दबाव वाढत असताना सरकारने मात्र चांगले आणि वाईट अतिरेक्यांची विभागणी करत ठोस कारवाई करण्यात कुचराई दाखवली होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत सरकारला जेयूडी व हक्कानी गटावर बंदी घालणे भाग पडले आहे.
संबंधित संघटनांवरील बंदीचा निर्णय बराच आधी घेण्यात आला होता, आता त्याच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली. बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सईदच्या फलाह-इ-इन्सानियतचाही (एफआयएफ) समावेश आहे.


अन्य आठ संस्थांवरही बंदीची कारवाई
हक्कानी नेटवर्क आणि जेयूडीवर बंदी घालण्याची मागणी अमेरिकेने केली होती. पाकिस्तान सरकार मात्र त्यात दिरंगाई करत होते, असे एका अधिका-याच्या हवाल्याने डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. बंदी घातलेल्या संघटनांमध्ये हरकत-उल-जिहाद इस्लामी, हरकत-उल-मुजाहिदीन, उम्माह तामीर-इ- नाऊ, हाजी खैरुल्लाह हाजी सत्तार मनी एक्सचेंज, राहत लिमिटेड, रोशन मनी एक्सचेंज, अल-अख्तर ट्रस्ट आणि अल-रश्दी ट्रस्ट यांचा समावेश आहे.

हक्कानीने केला होता वकिलातीवर हल्ला
यानंतर प्रतिबंधित संस्थांची मालमत्ता गोठवली जाईल. संघटनेवर बंदी घालण्याआधी जेयूडीची नावे वॉच लिस्टमध्ये प्रसिद्ध केली जातील. मुंबई हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबा, जमात -उद-दावाच्या नावाने सक्रिय झाली. जलालुद्दीन हक्कानीने हक्कानी गटाची स्थापना केली. २००८ मध्ये अफगाणिस्तानात भारतीय वकिलातीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात या संघटनेचा हात होता. यामध्ये ५८ जण ठार झाले होते. अफगाणिस्तानातील विविध स्फोटाशिवाय २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकी दूतावासावर या संघटनेने हल्ला चढवला होता.

संयुक्त राष्ट्रसंघाकडून २०१२ मध्ये बंदी
अफगाणिस्तानमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय हक्कानी गटाला मदत करत असल्याचा आरोप अमेरिका आणि अफगाण अधिका-यांनी वारंवार केला आहे. पाकिस्तानने मात्र हे आरोप फेटाळले. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१२ मध्ये या संघटनांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानने २००२ मध्ये जेयूडीवर बंदी घातली होती, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ती उठवण्यात आली. अमेरिका, इयू,भारत आणि रशियाने जेयूडीवर बंदी घातली आहे.