आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशात 71 च्या युद्धातील दोषी धार्मिक नेत्याला फाशी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात सहा हिंदूंची हत्या आणि असंख्य महिलांवर अत्याचार करणारा आणि कट्टरवादी धार्मिक नेता अब्दुल कलाम आझाद याला बांगलादेशच्या युद्धविषयक विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. आझाद हा फरार असून पाकिस्तानात दडून बसला असावा, असा अंदाज आहे.

युद्धविषयक विशेष न्यायालयाने 63 वर्षीय आझादला दोषी ठरवले आहे. अब्दुल आझाद ऊर्फ बच्चू रझाकार असे त्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय युद्ध लवादाचे न्यायमूर्ती ओबेदुल हसन यांनी आझादला मरेपर्यंत फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. जमात-ए-इस्लामी या कट्टरवादी संघटनेचा तो माजी सदस्य आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो देशातून पळून गेला. त्याच्यावर मानवतेविरुद्ध कृती केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यानंतर आझादने बांगलादेश सोडला. आझाद 1971 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने उभा होता. त्याच्यावर एकूण आठ आरोप आहेत. त्यापैकी सात प्रकरणांत तो दोषी आढळून आला आहे. खून, सामुदायिक हत्या, अपहरण, बलात्कार, छळ करणे हे आरोप त्याच्यावर आहेत. तो गैरहजर आहे म्हणून त्याला आरोपी म्हणता येणार नाही, असे होऊ शकत नाही. कारण त्याच्याविरुद्ध अनेक ठोस पुरावे आहेत, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.

मानवी हक्काचा प्रश्न
खटल्यात बचाव पक्षाचे अनेक साक्षीदार न्यायालय परिसरातून गायब झाले होते याकडे लक्ष वेधून न्यूयॉर्कमधील ह्यूमन राइट्स वॉचने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
नऊ महिने
पाकिस्तानातून बांगलादेशची फाळणी होताना झालेला संघर्ष जवळपास नऊ महिने चालला.
युनोची मान्यता नाही
तीन वर्षांपूर्वी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. या न्यायालयास संयुक्त राष्ट्राकडून मान्यता नाही. त्यामुळे त्याच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जमात-ए-इस्लामीची भूमिका काय होती ?
बांगलादेशने पाकिस्तानमधून बाहेर पडण्यास जमात-ए-इस्लामी संघटनेचा विरोध होता. त्यामुळे कट्टरवादी संघटनेने त्याविरुद्ध मोहीम सुरू केली होती. संघटनेने सामान्य नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्याला सहकार्य केल्याचा आरोपही आहे.