वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे पंतप्रधान पाहुणे आणि जगातील सर्वात समृद्ध राष्ट्राचे राष्ट्रपती जर यजमान असतील तर मग तो पाहुणचार कसा असेल, याची कल्पनाही
आपल्याला सुखावून जाते. मात्र, अशा वेळीही यजमानांना पाहुणचाराचे टेन्शन आले असेल तर ही आश्चर्याची बाब आहे.
या टेन्शनमध्ये सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा सापडल्या असून भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचा त्यांना २९ सप्टेंबर रोजी पाहुणचार करायचा आहे. मात्र, सध्या नरेंद्र मोदी यांचा नवरात्रीचा उपवास सुरू आहे. त्यामुळे आता त्यांना पाहुणचारात कोणते व्यंजन द्यावे, असा प्रश्न मिशेलताई आणि बराक ओबामा यांना पडलेला आहे.
मोदींसमोर बसून जेवणार कसे?
सोमवारी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. मात्र, मोदींना उपवास असल्यामुळे श्री. आणि सौ. ओबामा यांची अडचण झाली आहे. कारण मोदींना उपवास असताना आता त्यांच्यासमोर बसून आपण जेवायचे तरी कसे, असा प्रश्न ओबामांसमोर आहे. त्यानंतर ३० तारखेला अमेरिकेचे उपराष्ट्रपती ज्यो बिडेन आणि संरक्षणमंत्री जॉन केरी यांच्यातर्फे मोदी यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या वेळीसुद्धा यजमानांची हीच गोची होणार आहे.
तरीही मोदींनी आमंत्रण स्वीकारले
उपवास असलेल्या पाहुण्यांना भोजनासाठी बोलावणे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. ही बाब व्हाइट हाऊसच्या अधिका-यांना तसेच नरेंद्र मोदी यांनाही आधीपासूनच माहीत होती. तरीही, मोदी यांनी व्हाइट हाऊसकडून आलेले स्नेहभोजनाचे आमंत्रण स्वीकारले. त्यामुळे सोमवारी ते शक्यतोवर लिंबूपाणी पिऊनच यजमानांचे समाधान करतील.