चंदिगड - भूतानच्या दौ-यात भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे भव्यदिव्य आदरातिथ्य करण्यात आले होते आणि त्यात भूतानचे नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान बनल्यानंतर मोदी यांनी पहिला दौरा भूतानचा केला होता. मात्र, भूतानचे नरेश जिग्मे यांना भारतात चंदिगडला आल्यावर मोदींप्रमाणे वागणूक मिळणे तर दूरच; परंतु त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एकही मंत्री किंवा वरिष्ठ नेता नव्हता. इतकेच काय तर ते एअर इंडियाच्या ज्या विमानाने परतणार होते त्या विमानाला शिडी (स्टेप लॅडर) बसवतानासुद्धा नरेश जिग्मे यांना तब्बल ३४ मिनिटांपर्यंत विमानतळावर ताटकळत राहावे लागले.
एअर इंडियाची नाचक्की
भूतान नरेश जिग्मे हे पत्नी आशी जेत्सन पेमा यांच्यासह चंदिगडला आले होते. त्यांच्यासोबत भूतानच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळही होते. मायदेशी परतण्यासाठी त्यांच्या सेवेत एअर इंडियाच्या चार्टर्ड एअरक्राफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. निर्धारित वेळेनुसार नरेश विमानतळावर पोहोचले. मात्र, विमानाच्या शिडी दरवाज्यात अडकल्याने नरेशांना थांबवण्यात आले. वास्तविक या शिडी बसवण्यासाठी कमाल १० मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, एअर इंडियाच्या कर्मचा-याने त्यासाठी ३४ मिनिटांचा अवधी घेतला. शेवटी, २२ सदस्यीय भूतानचे शिष्टमंडळ विमानात जाऊन बसले. तेव्हा परत एकदा शिडी काढण्यात अडचणी येऊ लागल्या. अखेर विमानतळावरील इंजिनिअरिंग टीमला बोलावण्यात आले व त्यांनी २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर शिडी बाजूला केली आणि विमान रवाना झाले.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल केंद्रीय परराष्ट्र खात्याकडे पाठवणार असल्याचे भारतीय शिष्टाचार अधिकारी विभूर प्रभात यांनी सांगितले आहे.
शिष्टाचाराला मूठमाती
एका देशाचे प्रमुख या नात्याने भूतान नरेशांना भारतात तसा सन्मान मिळायला हवा होता. मात्र, हिमाचलचे राज्यपाल शिवराज पाटील ते गृहमंत्रालयातील एकाही अधिका-याने त्यांच्या स्वागताला जाण्याची तसदी घेतली नाही. आयजी आर. पी. उपाध्याय यांनी या दौ-याच्या शिष्टाचाराची नियमावली बनवली होती. मात्र, ते स्वत:च या वेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे डीआयजी ए. एस. चिमा यांनीच भूतान नरेशांचे स्वागत आणि त्यांना रवाना केले.