आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram Kidnaps Wife Of Cameroon’S Vice Prime Minister

उपपंतप्रधानांच्या पत्नी कॅमरूनमध्ये ओलीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याओंदे - बोको हराम अतिरेक्यांनी कॅमरूनचे उपपंतप्रधान अमदौ अली यांच्या पत्नीला ओलीस ठेवले आहे. अतिरेक्यांनी कोलोफाना शहरात उपपंतप्रधानांच्या घरावर हल्ला चढवला. हल्ल्यामध्ये अनेक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. यादरम्यान अन्य काही लोकांचेही अपहरण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
कॅमरूनचे माहिती आणि प्रसारणमंत्री इसा चरोमा यांनी उपपंतप्रधानांची पत्नी आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या अपहरणास दुजोरा दिला आहे. उपपंतप्रधानांव्यतिरिक्त अन्य एका जमातीच्या नेत्याच्या घरावर निशाणा साधण्यात आला. अपहरण नाट्यात उपपंतप्रधानांना सुरक्षित बाहेर काढून मोरा शहरात नेण्यात अंगरक्षकांना यश मिळाले. हल्ल्यातील मृतांची संख्या व अन्य ओलीस नागरिकांची माहिती नसल्याचे अली यांनी सांगितले.

येथील स्थिती खूप गंभीर आहे. बोको हरामचे अतिरेकी व जवानांमध्ये कोलोफातामध्ये उशिरापर्यंत चकमक सुरू होती, असे एका लष्करी प्रवक्त्याने सांगितले.
कॅमरूनला हल्ल्याची धमकी : कॅमरून दहशतवादी संघटना नष्ट करण्याच्या मोहिमेत सहभागी आहे. नायजेरियात लक्ष घातल्याबद्दल बोको हरामने कॅमरूनला धमकी दिली होती.

नेता व मेयरचे अपहरण
अपहृत नागरिकांमध्ये स्थानिक धार्मिक नेता आणि मेयरचा समावेश आहे. बोको हरामच्या उपद्रवामुळे सीमा क्षेत्रात लष्कर तैनात करण्यात आले आहे. अतिरेक्यांनी उत्तर कॅमरूनमध्ये एका फ्रेंच कुटुंबाचे अपहरण केले आहे. बोको हराम नाजेरियामध्ये इस्लामी राजवट स्थापन करू इच्छित आहे. नाजयेरियामध्ये दहशत निर्माण करणार्‍या बोको हरामने अलीकडेच मुलींचे अपहरण केले होते.
आठवड्यात तिसरा हल्ला : कॅमरूनच्या उपपंतप्रधानांच्या पत्नीच्या अपहरणावेळी करण्यात आलेला हल्ला हा शुक्रवारनंतरचा तिसरा हल्ला होता. या आधीच्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते.
वर्षभरात शंभर ठार
बोको हराम संघटनेने ईशान्य नायजेरियामध्ये जास्तीत जास्त कारवाया केल्या आहेत. अतिरेक्यांच्या हल्ल्यात वर्षभरात शंभरवर ठार झाले आहेत. कानो शहरातील चर्चवर रविवारी टाकण्यात आलेल्या बॉम्बमध्ये पाच जण ठार झाले. कानोमध्ये महिला आत्मघाती हल्लेखोराने विद्यापीठाबाहेर घडवून आलेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले.