आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पुन्हा एकदा भारतीय सिनेमांची चलती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - पाकिस्तानात भारतीय चित्रपट पुन्हा दाखवले जाऊ लागले आहेत. सध्या ‘हायवे’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’ ‘गुलाब गँग’ व ‘टोटल सियाप्पा’ आदी बॉलीवूड चित्रपट पाकिस्तानी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. लाहोर येथील प्रसिद्ध सिनेमागृहाचे व्यवस्थापक जाहिद हुसेन यांच्या म्हणण्यानुसार बॉलीवूडच्या चित्रपटांशिवाय पाकिस्तानी बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचे काही खरे नाही.

कराची येथील एट्रियम सिनेप्लेक्समध्ये सध्या ‘गुलाब गँग’ हा चित्रपट चांगला गल्ला जमवतो आहे. या थिएटरचे मालक नवाब सिद्दिकी यांचे म्हणणे असे की, ‘हिंदुस्थानी चित्रपटांवर बंदी घातल्याने आमच्याच सरकारचे नुकसान होत आहे. कारण स्थानिक चॅनेलवाले हिंदी चित्रपटांच्या बनावट सीडी तयार करून त्या केबल वाहिन्यांवर दाखवतात. त्यामुळे पाकिस्तानी प्रेक्षकांना भारतीय सिनेमे पाहू न देण्याचा सरकारचा उद्देश काही साध्य होत नाही.’ पाकिस्तानचे प्रसिद्ध नाट्यकर्मी मदीहा गौहर यांच्या मते भविष्यात ‘टोटल सियाप्पा’सारखे चित्रपट बनवले गेले पाहिजेत. यात भारतीय आणि पाकिस्तानी कलाकार मिळून काम करतील. असे केल्याने भारतीय सिनेमांना विरोध करणार्‍यांची तोंडे कायमची बंद होतील.

2013 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने घातली बंदी
डिसेंबर 2013 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खालिद महमूद खान यांनी भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. वादग्रस्त पाकिस्तानी टीव्ही टॉक शोचे निवेदक माबाशिर लुकमान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केला होता. लुकमान यांचा आरोप होता की भारतीय सिनेमे दाखवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यावेळी ‘धूम-3’ हा चित्रपट पाकमध्ये तुफान गर्दीत सुरू होता. या चित्रपटाने तेथे 21 दिवसांत 30 कोटींचा गल्ला जमवला होता. नंतरच्या काळातही इतर अनेक चित्रपट चांगले चालले होते.

‘व्यापार आदानप्रदान’मध्ये सिनेमाचा समावेश नाही
1965 च्या युद्धानंतर पाकिस्तान सरकारने भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. ही बंदी चार दशकांपर्यंत कायम राहिली. या काळात तेथे हिंदी सिनेमा चोरून प्रदर्शित होत राहिले. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी 2006 मध्ये भारतीय चित्रपटांवरील बंदी मागे घेतली होती. विशेष बाब म्हणजे दोन्ही देश परस्पर संबंध सुधारणे, व्यापार वाढ आदी मुद्दय़ांवर प्रयत्न करत असले तरीही त्यात चित्रपटांचा समावेश नाही. त्यामुळे पाकिस्तानी वितरकांना आजही भारतीय चित्रपट दुबईहून मागवून त्यांचे प्रदर्शन करावे लागते.