आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी भूमीत बॉलीवूड चित्रपटांचा ‘धूम’धडाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - चार दशकांच्या बंदीनंतर पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरात पाकिस्तानी प्रेक्षकांनी बॉलीवूड चित्रपटांना अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. बॉलीवूड पटांमुळे स्थानिक चित्रपटगृह मालकांची चांदी होत आहे, मात्र त्याच वेळी स्थानिक निर्मात्यांना आपला व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्यामुळे ते भारतातील चित्रपटांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या वर्षभरात 16 भारतीय सिनेमे प्रदर्शित झाले. अभिनेता आमिर खानच्या ‘धूम 3’ ला येथे जोरदार प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांचा ओघ कायम आहे. लाहोरमध्ये दोन नवी चित्रपटगृहे बांधण्यात आल्याने भारतीय चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या चित्रपटगृहाचे मालक रमजान शेख यांनी सांगितले. माझ्या दोन्ही चित्रपटगृहांतील चार खेळ ‘धूम 3’ साठी बुक असून शहरात आणखी एक चित्रपटगृह बांधत असल्याचे शेख म्हणाले.

बॉलीवूड चित्रपटांच्या विरोधात अनेक दिवसांपासून लढा देणारे निर्माते सईद नूर यांनी काही जण आपला चित्रपट उद्योग वाढीस लागू नये यात रस दाखवत असल्याचा आरोप केला. भारताच्या अब्जावधी रुपयांतून बनवलेल्या चित्रपटाशी येथील चित्रपट स्पर्धा करू शकत नाही. माझा भारतीय चित्रपटाला विरोध नाही. मात्र एक देशभक्त या नात्याने पाकिस्तानी सिनेमा वाचवण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानी निर्माते आणि चित्रपटगृह मालकांमध्ये झालेल्या करारानुसार 50 टक्के स्थानिक चित्रपट प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. याचा अर्थ चित्रपटगृह मालकांनी ठरावीक संख्येत पाकिस्तानी चित्रपट दाखवावेत, अशी मागणी नूर यांनी केली.

‘धूम 3’ ला दोन कोटींची ओपनिंग
‘धूम 3’ देशभरातील 56 चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाला 2 कोटी रुपयांचे ओपनिंग मिळाले. पाकिस्तानी चित्रपट ‘वॉर’पेक्षा ही कमाई दुप्पट आहे. ‘वॉर’चा पहिल्या दिवशी 1 कोटी 14 लाख रुपये गल्ला झाला होता. पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर राम-लीला, आशिकी 2 आणि चेन्नई एक्स्प्रेसने कमाल दाखवली आहे. दरम्यान, भारतीय चित्रपटांचे यश काही जणांना खुपत असल्यामुळे त्यांनी त्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.