ब्राझीलमध्ये जून महिन्यात होऊ घातलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला जोरदार विरोध केला जात आहे. ब्रासिलियामधील नॅशनल स्टेडियमबाहेर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला पारंपरिक वेशभूषा आणि भाला, तीरकमठा आणि धनुष्यबाण अशी पारंपरिक शस्त्रे हातात घेऊन विरोध करणार्या आदिवासींची लष्करी पोलिसांशी चकमक झाली. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज लष्करी पोलिसांच्या जवानांची पारंपरिक भाला- तीरकमठा या शस्त्रांचा सामना करताना चांगलीच तारांबळ उडाली. आदिवासींच्या जमिनी संरक्षित करण्यासाठी फेडरल कोर्टाने हस्तक्षेप करावा आणि फुटबॉल विश्वचषकावरील अवाढव्य खर्च टाळावा, अशी त्यांची मागणी आहे.