आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये सर्वत्र जल्लोष! नव्‍या राजपुत्राला 41 तोफांची सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- राजघराण्यातील बाळाच्या आगमनाचा ब्रिटनमध्ये रात्रभर जल्लोष सुरू होता. रेस्तराँ, हॉटेल्स, घरोघरी पार्ट्या करून ब्रिटनवासीयांनी रात्र जागून काढली. मंगळवारीही सकाळपासूनच बकिंगहॅम पॅलेससमोर ब्रिटिश नागरिकांप्रमाणेच पर्यटकांनीही गर्दी केली होती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तर गेल्या आठ दिवसांपासून तिथेच ठाण मांडून बसले आहेत. ब्रिटनची राजकुमारी केट मिडलटनच्या पोटी जन्मलेल्या शाही बाळाला पाहण्यासाठी लोक प्रचंड आतुरले आहेत. या बाळाचे नाव काय असेल, यावरून चर्चाच नव्हे, तर सट्टाही लावला जात आहे.

नामकरण होईपर्यंत या बाळाला ‘प्रिन्स ऑफ केंब्रिज’ म्हणून ओळखले जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री उशिरा ब्रिटिश राजघराण्याचा तिसरा वारसदार जन्मताच ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत निळ्या रंगाचे दिवे लावून माहिती देण्यात आली. केटला मुलगीच होणार, असे दावे अनेकांनी केले होते. तसे घडलेच तर मुलीला ब्रिटनच्या शाही घराण्याचा वारस म्हणून मान्यता देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचे प्रयत्नही सुरू झाले होते. या नव्या शाही पाहुण्याच्या स्वागतासाठी मंगळवारी 41 तोफांची सलामी देण्यात आली. गेल्या 21 दिवसांपासून सेंट मेरी रुग्णालयाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाण मांडले होते. स्थानिक वेळेनुसार सोमवारी सायंकाळी 4.24 वाजता केटच्या पोटी मुलगा जन्मला. आजोबा प्रिन्स चार्लस्, वडील प्रिन्स विल्यमनंतर तोच राजघराण्याची गादी चालवेल. या शाही बाळाची पणजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय सध्या ब्रिटनच्या महाराणी आहेत.

बाळंतपणासाठी माहेरी जाणार
डचेस ऑफ केंब्रिज केटला मुलगा, तर ड्यूक विल्यमला मुलगी हवी होती, पण अखेर केटचे स्वप्न पूर्ण झाले. मंगळवारी सायंकाळी अथवा बुधवारी केटला सेंट मेरी रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. त्यानंतर बाळ - बाळंतीण व प्रिन्स विल्यम केनसिंग्टन राजवाड्यात जाणार आहेत. प्रिन्सला दोन आठवड्यांची सुटी मिळाली आहे. त्यानंतर डचेस केट आपल्या माहेरी मिडलटन कुटुंबीयांसोबत बकलबरी (बर्क शायर) येथे काही काळ मुक्काम करणार आहे.