आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनची व्हिसा बाँड योजना अखेर संपुष्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनची वादग्रस्त व्हिसा सुरक्षा बाँड योजना रद्द होण्याची चिन्हे आहेत. भारतासह परदेशातून येणार्‍या नागरिकांसाठी हा बाँड अनिवार्य करण्यात आला असतानाच लवकरच ही योजना गुंडाळण्यात येणार असल्याचे ब्रिटनच्या गृह खात्याच्या सूत्रांनी म्हटले आहे.

गृह विभागाकडून जूनमध्ये ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश गृह सचिव थेरेसा मे यांनी बजावले होते. परंतु गृह खात्याच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन ‘संडे टाइम्स’ ने योजना बारगळणार असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे परराष्ट्रमंत्री हुगो स्वायर यांनी याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. टाटांची गुंतवणूक व अहमदाबादमध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा हवाला स्वायर यांनी दिला. ब्रिटनने काही देशांना हाय-रिस्क यादीत टाकले आहे. त्यात भारत, पाकिस्तान, नायजेरिया, श्रीलंका, घाना, बांगलादेश इत्यादी देशांचा समावेश आहे. हाय-रिस्क देशांतील नागरिकांच्या संख्येत घट करणे, असा योजनेमागील हेतू आहे. अल्पमुदतीचा व्हिसा संपल्यानंतर भेट देणार्‍या नागरिकांना 3 हजार पाउंड रोखीने देणे बंधनकारक करण्याची तरतूद आहे. देशात दाखल होण्यापूर्वीच नागरिकास यासंबंधीचा बाँड देणे अनिवार्य आहे. युद्ध गुन्हेगारीचा ठपका ठेवण्यात आल्याने श्रीलंकेवर कडक बंधने घालण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या तरी सरकारकडून बाँड योजना रद्द झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही.

भारताकडून अगोदरच नाराजी : ब्रिटनचे उपपंतप्रधान निक क्लेग यांनी व्हिसा बाँडची योजना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्याचबरोबर भारताकडूनही मंत्री तसेच अधिकारी पातळीवरदेखील योजनेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे योजना रद्द करण्यासंबंधी ब्रिटन सरकारवर सातत्याने अंतर्गत व बाह्य पातळीवर दबाव वाढला होता. त्यामुळे अखेर सरकारला असा निर्णय घ्यावा लागला.