आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्त : मुर्सीच्या सुटकेसाठी उतरलेल्या निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात 5 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तमधील नव्या लष्करसमर्थित प्रशासनाने मुस्लिम ब्रदरहूडच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केल्याने पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांचे संतप्त समर्थक शुक्रवारच्या नमाजनंतर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत.


लष्कराने केलेले सामोपचाराचे आवाहन धुडकावून मुर्सी समर्थकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी मुर्सी यांना सोडवण्यासाठी निघालेल्या समर्थकांवर सैनिकांनी गोळीबार केला.यात पाच जण ठार झाले. मुर्सी हे इजिप्तचे लोकशाही मार्गाने निवडलेले पहिलेच अध्यक्ष होते. त्यांना लष्कराने पदच्युत केल्यामुळे त्यांचे समर्थक चांगलेच खवळले आहेत.


मुर्सी यांना सैनिकांच्या बराकीत नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांना सोडवण्यासाठी निदर्शक शुक्रवारी बराकीकडे निघाले होते.त्यांनाही अडवण्यात आले.तत्पूर्वी लष्कराने मुर्सी यांना बुधवारी रात्री सत्तेतून बडतर्फ केल्यानंतर गुरुवारी इजिप्तमध्ये उसळलेल्या हिंसाचारात किमान 11 जण ठार, तर 516 जण जखमी झाले आहेत.


महाधिवक्त्याचा राजीनामा
पुनर्स्थापित करण्यात आलेले इजिप्तचे महाधिवक्ता अब्देल मेगुईद महमूद यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. महमूद यांना मुर्सी यांनी बडतर्फ केले होते आणि डिक्री जारी करून सर्व अधिकार आपल्याकडे घेतले होते. त्यांच्या या निर्णयाला महमूद यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. महमूद यांची बडतर्फी मंगळवारी रद्द करण्यात आली होती.


ओबामांनी घेतला परिस्थितीचा आढावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमधील घडामोडींबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक घेऊन आढावा घेतला. इजिप्तमध्ये लवकरात लवकर लोकनियुक्त नागरी सरकार स्थापन व्हावे, अशी अमेरिकेची इच्छा असून त्यासाठी सुरक्षा सल्लागार इजिप्तमधील अमेरिकी दूतावास आणि प्रादेशिक भागीदारांच्या संपर्कात आहेत.