आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bulgarian People Strong Agitation Against Government

बल्‍गेरियन जनतेचा एल्‍गारः तीन मंत्री, 100 सदस्यांना जनतेने संसदेत कोंडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोफिया - भ्रष्टाचारी सरकारविरोधात मंगळवारी बल्गेरियाच्या जनतेने एल्गार पुकारला. तीन मंत्र्यांसह सुमारे 100 संसद सदस्यांना संसदेच्या इमारतीत कोंडून ठेवत अभूतपूर्व आंदोलन केले. हजारो नागरिकांनी संसदेच्या इमारतीबाहेर ठिय्या देऊन आठ तास या संसद सदस्यांना बाहेर येण्यास मज्जाव केला. अखेर दंगा काबू पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात या सदस्यांची सुटका करण्यात आली. या वेळी उडालेल्या धुमश्चक्रीत दहा नागरिक व दोन पोलिस जखमी झाले.

भ्रष्टाचार आणि आर्थिक अनागोंदी माजलेल्या बल्गेरियात गेल्या 40 दिवसांपासून सत्ताधारी सोशालिस्ट सरकारविरुद्ध राजधानी सोफिया येथे आंदोलन सुरू होते. सायंकाळी संसदेत अर्थसंकल्पावर रात्रीही उशिरा वादळी चर्चा सुरू होती. यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक तूट वाढवून सरकारी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली.सरकारी खर्चात कपातीचीही तरतूद करण्यात आल्यामुळे अनेक सरकारी योजनांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे संसदेला लोकांनी घेराव घातला होता. मंगळवारी रात्री आंदोलन टिपेला पोहोचले होते.

‘माफिया, राजीनामा द्या’अशा गगनभेदी घोषणा सुरू होत्या. रात्री दहा वाजता काही मंत्री, संसद सदस्यांना पोलिस बंदोबस्तात बसमधून बाहेर नेताना लोकांनी बस अडवली. बसभोवती जनतेने कडे केले. त्या वेळी पोलिसांसोबत चकमक सुरू झाली. जनतेचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी ती बस पुन्हा संसदेच्या इमारतीकडे वळवली. रात्री दहा वाजता (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30) सुरू झालेले हे आंदोलन सकाळी पाच वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 7 :30) वाजता संपले.


आंदोलन कशासाठी ?
वीज दरवाढ, महागाई आणि सुमारे 3900 कोटी रुपयांचे सरकारी कर्ज काढण्याविरोधात जनता आंदोलन करीत आहे.


10,000 लोक गेल्या 40 दिवसांपासून सरकारविरोधात दररोज संसदेबाहेर साखळी आंदोलन करीत होते. बुधवारी सकाळी संसद सदस्यांची सुटका केल्यानंतरही 30 निदर्शक ठिय्या देऊन होते.


गरीब राष्ट्र
बाल्कन प्रदेशातील एक गरीब राष्ट्र म्हणून ओळख आहे. येथे सोशलिस्ट सरकार आहे. 240 सदस्यांच्या संसदेत सत्ताधारी पक्षाकडे 120 सदस्य आहेत. बहुमत नसल्याने हे सरकार काळजीवाहू समजले जाते.