ग्वांग्झु - दक्षिण कोरियात याचवर्षी १६ एप्रिल रोजी जहाज बुडाल्याच्या घटनेप्रकरणी पळपुट्या कॅप्टनला ३६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या घटनेत लहान मुलांसह ३०० जणांचा मृत्यू झाला. ६९ वर्षीय कॅप्टनचे नाव जून सेओक असे आहे.
पाच महिने चाललेल्या या खटल्यात तीन न्यायाधीशांच्या पीठाने निर्णय दिला की, या घटनेत कॅप्टनवर निष्काळजीपणा, कर्तव्य पालनात हलगर्जीपणा आणि गंभीर म्हणजे शेकडो प्रवासी असलेले जहाज बुडत असताना पळून जाण्याचा आरोप सिद्ध झाला. याचिकाकर्त्यांनी कॅप्टनवर शेकडो प्रवाशांच्या हत्येचा आरोप केला. मात्र, त्याच्या पळून जाण्यामागे हत्येचा हेतू होता, हे त्यांना कोर्टात सिद्ध करता आले नाही. परिणामी न्यायालयाने कॅप्टनला ३२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
कोर्टातच आक्रोश
बुडालेल्या जहाजात बहुतांश लहान मुले होती. त्यामुळे पालकांना न्यायालयाकडून यापेक्षाही कठोर शिक्षेची अपेक्षा होती. हा निकाल ऐकल्यानंतर कोर्टात हजर असलेल्या नातेवाइकांचा संताप अनावर झाला. अनेक जण मोठमोठ्याने रडून आक्रोश करू लागले, तर एक महिला जोरात ओरडली, ‘पण न्याय कुठे मिळाला? हा निकाल योग्य नाही. आमच्या मुलांचे प्राण गेले. त्यामुळे दोषी व्यक्तीला मृत्युदंडापेक्षा कठोर शिक्षा हवी.’ या घटनेतील अन्य तीन क्रूर सदस्यांवर मनुष्यवधाचा आरोप होता. त्यांना १५ ते ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
कृत्य हत्येसमान
दक्षिण कोरियातील माध्यमांमध्ये या जहाजाचा कॅप्टन दोषी असल्याच्या बातम्या झळकत होत्या. खटल्याप्रकरणी सुनावणी होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष पार्क गेऊन हेई यांनी सार्वजनिकरीत्या ‘कॅप्टनची कृती हत्येसमान’ असल्याचे म्हटले होते. तसेच जहाजाला धोका असतानाही प्रवाशांना आहे त्याच ठिकाणी बसण्याच्या सूचनाही कॅप्टननेच दिल्या होत्या, असे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.