Home »International »Other Country» Chavez Become President Without Taking Oath

शॅवेझ शपथविधी न घेता होणार राष्‍ट्रप्रमुख

वृत्तसंस्‍था | Jan 10, 2013, 05:18 AM IST

  • शॅवेझ  शपथविधी  न घेता होणार राष्‍ट्रप्रमुख

कॅराकस - कर्करोगाशी झुंजणारे ह्युगो शॅवेझ शपथ न घेताच व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत. शपथ न घेताच राष्ट्रप्रमुखाचे पद भूषवण्याचे हे जगातील कदाचित पहिलेच उदाहरण ठरणार आहे. व्हेनेझुएलामध्ये ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात शॅवेझ यांची पुन्हा चौथ्या वेळेस राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली.

घटनेनुसार उद्या गुरुवारी शॅवेझ यांचा शपथविधी समारंभ होणार होता, परंतु कर्करोगावरील इलाजासाठी शॅवेझ क्युबाला गेले असून ते अद्याप अंथरुणावरून उठण्याच्या स्थितीत नाही. 11 डिसेंबरपासून शॅवेझ यांचे जनतेला व जगालाही दर्शन झालेले नाही. मध्यंतरी शॅवेझ यांच्या निधनाच्या वावड्याही स्पेनमधील प्रसारमाध्यमांनी उडवल्या होत्या.दरम्यान, आजारी राष्ट्राध्यक्षांसाठी नॅशनल असेंब्लीने मंगळवारी शॅवेझ यांनाशपथविधीसाठी मुदतवाढ दिली.

आजारपणातून उठल्यानंतर शॅवेझ यांनी शपथ घ्यावी, असा ठराव करण्यात आला. याचाच अर्थ तब्येत ठणठणीत होईपर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

देशात वाद-विवाद
घटनेच्या मुद्द्यावरून वादविवाद सुरू झाले आहेत. नॅशनल असेंब्लीच्या निर्णयावर विरोधकांनी सर्वोच्च् न्यायालयाचे मत मागण्याचा आग्रह धरला आहे. असेंब्लीचे अध्यक्ष काबेलो यांना काळजीवाहू राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते हेनरिख कॅपरिले यांनी केली आहे.

तर्कवितर्क
शॅवेझ यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे माहिती मंत्री अर्नेस्तो विलेगा यांनी सांगितले, परंतु यामुळे शॅवेझ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष.

व्हेनेझुएलाची घटना
कलम 231: नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आपल्या घटनात्मक कार्यकाळाच्या पहिल्या वर्षी 10 जानेवारी रोजी नॅशनल असेंब्लीमध्ये शपथ घेईल. काही कारणास्तव असेंब्लीसमोर शपथ न घेतल्यास तो सर्वोच्च् न्यायालयासमोर शपथ घेईल.
कलम 233 : नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष पदभार घेण्यापूर्वी गैरहजर राहिल्यास पुढील 30 दिवसांत नव्याने निवडणूक घ्यावी. या कालावधीत असेंब्लीचे अध्यक्ष काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असतील. ही गैरहजेरी कार्यकाळाच्या पहिल्या 4 वर्षांत असेल, तर 30 दिवसांत निवडणूक होईल. उपराष्ट्राध्यक्ष काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असतील.

Next Article

Recommended