आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Discussed Accenture For Shendra Bidkin Smart City In Aurangabad

औरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीन स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्री-अँक्सेंचरमध्‍ये चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दावोस/मुंबई - औरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीनमध्ये स्मार्ट सिटी उभारण्याच्या दृष्टीने स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत एक पाऊल पुढे पडले. शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अँक्सेंचर कंपनीच्या पदाधिकार्‍यांत याबाबत चर्चा झाली. शेंद्रा-बिडकीनसह पुण्यातील हिंजेवडी येथेही अशी स्मार्ट सिटी उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून अँक्सेंचरने त्यात स्वारस्य दाखवले आहे.
अँक्सेंचर या जागतिक सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीटर लॅसी आणि सीईओ ज्युली स्वीट यांना मुख्यमंत्र्यांनी या प्रारूपाबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, उत्तम शहरांच्या उभारणीसाठी मजबूत यंत्रणा आवश्यक आहे. पुण्यातील हिंजेवाडी, औरंगाबादेतील शेंद्रा-बिडकीन येथे स्मार्ट सिटी उभारण्याबाबत अँक्सेंचरशी चर्चा करण्यात आली. अँक्सेंचर कंपनीचे पदाधिकारीही यासाठी उत्सुक आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये येणार्‍या शहरांत स्मार्ट सिटीचे प्रारूप कसे राबवता येईल, याबाबतही या भेटीत चर्चा झाली. डीएमआयसीमध्ये येणार्‍या सर्व शहरांत स्मार्ट सिटीचे प्रारूप राबवण्याबाबत अँक्सेंचरला सांगण्यात आले आहे.
फायदा काय?
स्मार्ट सिटीत गुंतवणूक करण्यास जगातील अनेक कंपन्या प्राधान्य देतात. डिजिटल सेवा क्षेत्रातील उद्योग स्मार्ट सिटीला प्राधान्य देतात. अशा शहरांत दज्रेदार पायाभूत सुविधा असल्याने सामाजिक व आर्थिक विकास गतीने साधण्यास मदत होते.
नगररचनेचे काम एईकॉमकडे
शेंद्रा-बिडकीन स्मार्ट सिटी उभारणीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने 14 ऑक्टोबर 2011 रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी नगररचनेचे काम अमेरिकेच्या एईकॉम कंपनीकडे सोपवण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी म्हणजे काय?
जेथे सामाजिक, आर्थिक गुंतवणुकीसह अतिउच्च दर्जाचे राहणीमान, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, कुशल व प्रभावी सुव्यवस्थापन असते त्याला स्मार्ट सिटी असे संबोधतात. दुबई, कोपनहेगन, अँमस्टरडॅम, व्हिएन्ना, पॅरिस ही स्मार्ट सिटीची काही उदाहरणे आहेत. केरळातील कोची येथे 2012 पासून स्मार्ट सिटीचा प्रकल्प आकार घेत आहे. अँक्सेंचर ही जागतिक दर्जाची या क्षेत्रातील सल्लागार कंपनी आहे.