आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी हद्दीत चीनची घुसखोरी, चिनी राजदूताला तंबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- पूर्व चीन समुद्रातील बेटावरून जपान आणि चीनमध्ये संघर्ष उफाळला आहे. गस्त घालणाºया तीन चिनी नौका आज या बेटांवर जाताच जपानी तटरक्षक दलाने या नौकांना पिटाळून लावले. या घटनेचे तीव्र पडसाद राजनैतिक पातळीवरही उमटले. कंबोडियात सुरू असलेल्या आसियान परिषदेत चिनी परराष्ट्रमंत्री याँग जिएची यांनी जपानी परराष्ट्रमंत्री कोईचिरो गेम्बा यांची भेट घेऊन या बेटांवर चीनचाच हक्क असल्याचे सांगितले. तर टोकियोत चीनी राजदूताला तंबी देऊन वादग्रस्त बेटावर पुरातन काळापासून जपानचाच हक्क असल्याचे सांगितले आहे.
युझेंग 35001, युझेंग 204 आणि युझेंग 202 या तीन चिनी नौका पूर्व चिनी समुद्रात गस्त घालताना वादग्रस्त बेटांच्या जवळ गेल्या. या भागात बेटांचा एक समूह असून जपानी त्याला सेनकाकू म्हणतात. तर चीनमध्ये या बेटांना दीयू म्हटले जाते. या निर्जन बेटांवर दोन्ही देशांचा दावा आहे. दोन्ही देश या बेटांवर पुरातन काळापासून आपलाच हक्क असल्याचे सांगतात.
आज सकाळी चिनी नौका सेनकाकू बेटांच्या जवळ येताच जपानी तटरक्षक दलाने त्यांना इशारा दिला. पण या नौकांनी त्या इशाºयाकडे दुर्लक्ष केले.आम्ही चीनच्या हद्दीत आहोत. तुम्हीच चीनच्या हद्दीतून बाहेर जा, असा उलट इशारा चिनी जहाजांनी दिला. अखेर जपानी जहाजाने या तिन्ही जहाजांच्या मागे जात त्यांना पिटाळून लावले. हे वृत्त कळताच दोन्ही देशांत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. जपान सरकारने तत्काळ पत्रकार परिषद घेऊन सेनकाकू बेटांवर जपानचाच जन्मसिद्ध हक्क असल्याचे ठणकावले. चिनी राजदूताला तंबी दिली. लगोलग चीनचे परराष्ट्रमंत्री लिएची यांनी जपानी मंत्री गेम्बा यांची आसियान परिषदेत भेट घेतली. या भेटीमध्ये दिआयू बेट आणि परिसरातील बेटांचा समूह हे पुरातन काळापासून चीनचेच प्रदेश असल्याचे ठणकावले. या मुद्द्यावर योग्य मार्गाने चर्चा करून प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले. दक्षिण चीन समुद्रातील भागांवरही चीनचे भारतासह इतर शेजारी देशांशी तंटे सुरू आहेत. या समुद्राची मालकी आपल्याकडे असल्याचा चीनचा दावा आहे.
खनिज संपत्तीचा साठा- जपानी सेनकाकू आणि चीनच्या मते दीयू या वादग्रस्त बेटाभोवती प्रचंड जैविक संपत्ती व खनिज संपत्तीचा मुबलक साठा आहे. जपानच्या म्हणण्यानुसार हे बेट खासगी मालकीचे असून जपान सरकार हे विकत घेणार आहे. त्यासाठी टोकियो महानगर सरकारने सुमारे 16.3 दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे 90 कोटी रुपये) निधी उभारला आहे. चीनने लगोलग जपानचा हा दावा फेटाळला असून बेट खरेदी करण्याचा जपानला अधिकार नसल्याचे म्हटले आहे.