आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंगमध्ये मोठ्या कुत्र्यांवर बंदी घातल्यामुळे नवे वादंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनने मोठी कुत्रे ‘निर्दयी’ असल्याचे सांगत त्यांच्यावर बीजिंगमध्ये बंदी घातली असून त्यामुळे कुत्र्याची उंची, प्रजात आणि श्वानाचे वर्तन नियंत्रित करण्याची मालकाची जबाबदारी यावरून जोरदार वादविवाद झडू लागले आहेत.

बंदीचा आदेश जारी झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने आठ प्रमुख प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये 35 सेंटिमीटरपेक्षा उंच असलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. या भागात एका घरी एकच कुत्रा पाळण्यास परवानगी आहे. आपले कुत्रे पोलिस हिसकावून नेतील या धास्तीने श्वानप्रेमींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांनी केलेले हल्ले आणि श्वानदंशामुळे मृत्युमुखी पडणारांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. कुत्र्याची हिंस्रता त्याच्या आकारावर अवलंबून नसते, असे प्राणितज्ज्ञांचे मत आहे. उंचीपेक्षा कुत्र्याची प्रजात पाहून त्याची हिंस्रता ठरवली पाहिजे. उंची हे काही त्याच्या हिंस्रतेचे मोजमाप करण्याचे एकक नाही, असे चीन-बीजिंग श्वान क्लबचे शेन रुइहाँग यांनी म्हटले आहे.

बीजिंगमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. मोठी कुत्री आक्रमक असतात. त्यामुळे लोकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे वांग शिजून या स्थानिक नागरिकाने म्हटले आहे. अन्य देशांमध्ये कुत्र्याच्या मालकांवर कडक निर्बंध आहेत. अमेरिकेत एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावल्यास त्याच्या मालकाला 90 दिवसांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, तर इस्रायलमध्ये प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कुत्रे पाळताच येत नाही. कुत्र्यांवर बंदी घालण्यापेक्षा मालकांवर जबाबदारी निश्चित करावी आणि शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी काही श्वानप्रेमी करू लागले आहेत.