बीजिंग - हाँगकाँगमधील आंदोलनामागे अमेरिकेची फूस असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेचा एक अधिकारी काही दिवसांपूर्वी तिबेट तसेच स्वतंत्र शिनजियांगची मागणी करणा-या बंडखोर नेत्यांशी भेटला होता. त्यावरून चीनने हे फुत्कार टाकले आहेत.
नॅशनल एंडोव्हमेंट फॉर डेमोक्रसी ऑफ द यूएसचे (एनईडी) संचालक लुईसा ग्रीव्ह यांनी ‘ऑक्युपाय हाँगकाँग’ आंदोलन करणा-या नागरिकांची भेट घेतली होती. ही भेट अनेक महिन्यांपूर्वी झाली होती, असा आरोप सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीकडून करण्यात आला आहे. आशिया, मध्य-आशिया, उत्तर आफ्रिकेतील अमेरिकेच्या कार्यक्रमासंबंधी ग्रीव्ह यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे बंडखोरांना फूस लावण्याचे काम लुईसा यांनी केले आहे, असा आरोप चीन सरकारकडून करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलनाची ‘गोडी’
अमेरिका केवळ तिबेट प्रश्नावरच नव्हे, तर जगातील इतर आंदोलनांतही सातत्याने नाक खुपसत आली आहे. ‘इजिप्त आंदोलन’, ‘युक्रेनमधील संघर्ष ’ यात अमेरिकेचा सातत्याने हस्तक्षेप राहिला आहे. फूस लावण्याचे काम करण्यात अमेरिकेला नेहमीच आनंद होतो.