आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Calls On US To Scrap Meeting Between Obama And Dalai Lama

ओबामा- दलाई लामा चर्चेने चीनचा तिळपापड; अमेरिकी प्रतिनिधीला पाचारण करून निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली होती. उभय नेत्यांमधील बैठकीवरून चीनचा जळफळाट झाला आहे. बैठकीमुळे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.
चीनचे उपपरराष्ट्रमंत्री झांग येसुई यांनी अमेरिकी राजदूत डॅनियल क्रिटेनब्रिंक यांना बोलावून बैठकीबद्दलचा निषेध व्यक्त केला. चीनने अमेरिकी राजदूताकडे आपला कडवा विरोध नोंदवला. लामा यांच्याशी चर्चा करणे म्हणजे आमच्या सार्वभौमत्वामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे, असा हस्तक्षेप कदापिही खपवून घेतला जाणार नाही. अमेरिकेचे हे चुकीचे पाऊल आहे. ‘स्वतंत्र तिबेट’ला सर्मथन देण्याची अमेरिकेची भूमिका आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय संबंधांच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली करणारी आहे. त्यामुळे आम्ही त्यावर ‘संताप आणि कडवा विरोध’ व्यक्त करतो, असे झांग यांनी स्पष्ट केले. ओबामा यांनी बैठकीत जवळपास मौन बाळगले होते. त्यांनी केवळ लामा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. लामा यांनी अमेरिकेशी चर्चा करून चीनवर दबाव आणण्याची खेळी सहजपणे खेळली आहे. ही खेळी अतिशय मजबूत ठरणार आहे. दुसरीकडे बैठकीनंतर सर्वात पहिला फटका चीनला बसणार आहे. चीनच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा दावा ‘ग्लोबल टाइम्स’च्या संपादकीयमधून करण्यात आला आहे. पाश्चात्त्य देशांचा पाठिंबा मिळवण्यात लामा मोठय़ा प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पाश्चात्त्य जगातील विविध नेते त्यांची एकानंतर एक अशी भेट घेत आहेत. खरे तर त्यांना पाश्चात्त्य देशांकडून इतर कोणत्याही गोष्टींची मदत मिळत नाही, हेदेखील स्पष्ट आहे, असे सत्ताधारी पक्षाच्या मुखपत्राने स्पष्ट केले आहे.
ओबामांची भूमिका काय?
तिबेटच्या मुद्दय़ावर दलाई लामा आणि बराक ओबामा यांच्यात झालेल्या बैठकीत ओबामा यांनी तिबेटी नागरिकांना मानवी हक्काच्या पातळीवर आपला खंबीर पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर लामा यांच्या मध्य मार्गाचेही सर्मथन केले. चीनमध्ये विलीनीकरण किंवा स्वातंत्र्य यापेक्षा वेगळा मार्ग लामा यांनी मांडला आहे. त्याला अमेरिकेने जोरदार पाठिंबा दिला आहे.
तिसरी बैठक
चीनचा सातत्याने विरोध असतानाही अमेरिकेने त्याला न जुमानता लामा यांची भेट घेतली. या अगोदर 2010 आणि 2011 मध्ये उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यांची ही तिसरी बैठक आहे. त्यामुळे चीनने त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.