नवी दिल्ली/अहमदाबाद - चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या १७ सप्टेंबरच्या नियोजित अहमदाबाद दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे चिनी सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत ५०० मीटरपर्यंत घुसखोरी करून तंबू ठोकले आहेत.सूत्रांनुसार, गेल्या महिन्यातही चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत २५ किमीपर्यंत घुसखोरी केली होती. आयटीबीपीचे ७० जवान या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. या वर्षी आतापर्यंत चिनी सैनिकांनी ३३४ वेळा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे.
दरम्यान, ताजिकीस्तानची राजधानी दुशाम्बे येथून चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे की, सीमाप्रश्नामुळे दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांवर कोणताही प्रतिकूल परणिाम
होणार नाही.
चीनला सीमाप्रश्न सोडवायचा नाही
माजी मुत्सद्दी रंजितसिंह काल्हा यांच्या दाव्यानुसार, चीनला सीमाप्रश्न सोडवायचाच नाही. ‘इंडिया-चीन बाउंड्री इश्यू : क्वेस्ट फॉर सेटलमेंट’ या पुस्तकात काल्हा यांनी म्हटले आहे की, घुसखोरीच्या माध्यमातून भारताला धमकावत राहणे हा चीनचा उद्देश आहे. काल्हा हे परराष्ट्र मंत्रालयात सचिव होते. त्यांनी १९८५ ते १९८८ पर्यंत सीमाप्रश्नी चर्चेसाठी नेमण्यात आलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व केले आहे.
सीमाप्रश्न काय?
भारत-चीनदरम्यान अनेक वर्षांपासून सीमेवरून वाद आहेत. भारताच्या मते, ४ हजार किमींची सीमा वादग्रस्त आहे, तर चीनच्या मते, २ हजार किलोमीटर सीमेचाच वाद आहे. चीनचा अरुणाचल प्रदेशवर, तर भारताचा अक्साई चीनवर दावा आहे. दोन्ही देशांच्या विशेष राजदूतांमध्ये १७ वेळा चर्चा होऊनही या वादावर तोडगा निघालेला नाही.