आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China Has Secretly Entered Into An Agreement With Pakistan To Construct A Third Nuclear Reactor At Chashma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची डोकेदुखी वाढणार; पाकिस्तानमध्ये चीनची अणुभट्टी, अमेरिका संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - चीनी ड्रॅगन पुन्हा आग ओकताना दिसत आहे. चीनचे 'नापाक इरादे' अमेरिकेची गुप्तचर संस्था आणि राजदुतांनी उजेडात आणले आहेत. पाकिस्तानसोबत चीन पाकिस्तानच्या उत्तर पंजाब प्रातांतील चष्मा येथे अणुभट्टी तयार करत आहे. दोन्ही देशांमध्ये तसा करार झाला आहे.

चीनचे हे नापाक इरादे पाहून अमेरिका संतप्त झाली असून त्यांनी चीनला इशारा दिला आहे. चीन जे काही करत आहे त्यामुळे अण्विक शस्त्रास्त्र विरोधी आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगून, अमेरिकेने चीनला कडक शब्दात सुनावले आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनुसार पाकिस्तानमधील चष्मा येथे तीन अणुभट्ट्या उभारण्यासंदर्भात पाकिस्तान आणि चीन यांच्यात गुप्त करार झाला आहे. पाकिस्तानचे अणुऊर्जा आयोग १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान बीजिंग दौ-यावर होते तेव्हा या गुप्त करारावर स्वाक्षरी झाल्याची अमेरिकेने शक्यता वर्तवली आहे.


ज्या ठिकाणी अणुभट्टी उभारली जाणार आहे तेथे अगोदरच दोन अणुभट्ट्या तयार आहेत. चीन-पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारानुसार चीनचे नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन येथे एक हजार मेगावॉट वीजनिर्मीती करणार आहे. त्यासाठी तीन अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहे.

अमेरिकन दुतावासातील एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या महिन्यात चीनमध्ये एक व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व राजकीय नेते आणि अधिका-यांना या कराराबद्दल कुठेही, काहीही न बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कराराबद्दल वाच्यता केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असेही नमुद करण्यात आले आहे.

अमेरिकेने याआधीही आरोप केला होता की, चीनचे नॅशनल न्यूक्लिअर कॉर्पोरेशन (सीएनएनसी) पाकिस्तानाला अण्विक अस्त्र तयार करण्यासाठी मदत करत आहे.

पाकिस्तानला चीन करत असलेली मदत भारतासाठीही मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या छावनीवर हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही घटनांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले होते.

पाकिस्तान भारताला असे कायम डिवचत असताना आता, चीन पाकिस्तानच्या मदतीला धावून येत आहे. यामुळे भारतापुढील संकट वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनच्या सीएनएनसीने १९९० मध्ये हजारो मॅग्नेट रिंग पाकिस्तानला विकल्या होत्या. या रिंगद्वारे पाकिस्तानने युरिनिअम तयार केले होते. याच युरेनिअमचा अणुबॉम्बसाठी उपयोग केला जातो.

अमेरिकेच्या एका अहवालानुसार चीनने पाकिस्तानला अण्वस्त्रांचे डिझाईन आणि तंत्रज्ञान याआधीच दिलेले आहे. तर पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये अण्वस्त्रांचे शस्त्रागार तयार केले असून त्या शस्त्रागारात ११० पेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत. यामुळे चीनच्या मदतीने पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज राष्ट्र बनत आहे. त्यांच्या या कारवायांमुळे भारतासमोरील धोका वाढमणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.