बीजिंग - अमेरिका आणि युरोपातील शहरांवर अण्वस्त्र असलेली क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता चीनकडे आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रगत क्षेपणास्त्राची चीनने शनिवारी यशस्वी चाचणी केली. १०,००० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची त्याची क्षमता असून अण्वस्त्रे वाहून नेण्यासही ते सक्षम आहे.
हाँगकाँगच्या ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, १ ऑक्टोबर रोजी चीनमध्ये राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. त्याच्या काही दिवस आधीच २५ सप्टेंबर रोजी चीनने डोंगफेंग- ३१ बी नावाच्या या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र डीएफ-३१ ए या क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आहे. तीन महिन्यांत पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) वतीने या क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी घेण्यात आली.
या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून चीन
आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका आशिया-प्रशांत प्रदेशात आपले लष्करी अस्तित्व वाढवत असल्यामुळे चीनला अशा शस्त्रांची गरज आहे, असे पीएलएचे निवृत्त मेजर जनरल शू गुआंगयू यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत कुठेही हल्ला
अमेरिकेतील कोणत्याही शहरावर हल्ला करण्याची डोंगफेंग- ३१ बी या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. त्याची कमाल मारक क्षमता १२,००० कि.मी. आहे. या क्षेपणास्त्रामुळे अख्खा युरोप चीनच्या टप्प्यात आला आहे.