बीजिंग - अरुणाचल प्रदेशवर दावा सांगणा-या वादग्रस्त नकाशाच्या सुमारे 15 लाख प्रती चीनने छापल्या आहेत. त्यांचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. जवळपास 30 वर्षांनंतर गेल्या महिन्यात हे वादग्रस्त नकाशे जारी करण्यात आले आहेत. यात अरुणाचल प्रदेश आणि दक्षिण चीन सागरातील वादग्रस्त भागावर त्यांनी दावा सांगितला असून भारताने या कृतीवर आक्षेप नोंदवला आहे.
चिनी लष्कराचे दैनिक ‘पीएलए डेली’च्या लष्कराच्या सर्व मुख्य विभागांना लवकरच सुधारित व अचूक नकाशे पाठवले जातील. त्यासाठी नकाशाच्या 15 लाख प्रती छापण्यात आल्या आहेत. त्यात अरुणाचल हा चीनचा भाग असल्याचे दर्शवण्यात आले आहे. मात्र, चीनच्या अधिकृत मीडिया एजन्सीने याला दुजोरा दिलेला नाही. चीनच्या वादग्रस्त नकाशांबाबत भारताने आक्षेप नोंदवला आहे. नकाशे बदलल्याने सत्य बदलत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.