आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Opens Tibet Highway Near Arunachal Pradesh

चीनचा खोडसाळपणा: अरुणाचलला लागूनच चीनचा सामरिक महामार्ग खुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनने भारतीय सीमेलगत अरुणाचल प्रदेशला लागून सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला 117 किलोमीटर लांबीचा तिबेट महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग तिबेटच्या दुर्गम भागाशी जोडण्यात आला आहे. या महामार्गामुळे भारताला लागून असलेल्या प्रदेशांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे सोपे जाईल, असे चिनी विश्लेषकांना वाटते.

सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तिबेटमधील मेडॉग प्रांत या महामार्गाद्वारे उर्वरित चीनशी जोडण्यात आला आहे. रस्तेमार्गाने पोहोचता न येणारा हा चीनमधील एकमेव प्रदेश होता. भारताला लागून देशाची सीमा असल्यामुळे हा महामार्ग चीनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यात महत्त्वाचा ठरणार आहे, असे संरक्षणतज्ज्ञांना वाटते, असे चायना डेलीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. चीनचा भारताशी सीमावाद सुरू असून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यादृष्टीने हा सामरिक संदर्भ दिला जात आहे.

भारत आणि चीनने सीमा संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी करून आठ दिवसही झाले नाही तोच हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून वारंवार होणारी घुसखोरी आणि आक्रमक गस्त या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गेल्याच महिन्यात भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे चीनमध्ये आले होते. उभय देशांतील सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींनी चर्चेच्या 16 फे-या केल्या आहेत. सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांची निर्मिती हा भारत आणि चीनमध्ये नजीकच्या काळात कळीचा मुद्दा ठरलेला आहे.

पाच दशकांत सात वेळा अयशस्वी प्रयत्न
हा महामार्ग बांधण्यासाठी चीनने पाच दशकांत तब्बल सात वेळा केलेल्या अयशस्वी प्रयत्नांनंतर हा महामार्ग पूर्णत्वास गेला आहे. 1960 मध्ये पहिल्यांदा चीनने हा महामार्ग बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1962 मध्ये भारताचे चीनशी युद्ध झाले होते.