बीजिंग - नागरी वसाहतीच्या इमारतीमधून रेल्वे जाते असे सांगितल्यानंतर आपला विश्वास बसणार नाही. मात्र, हे वास्तव आहे. चीनच्या चोंगकिंगच्या युझोंगमध्ये मोनोरेल रेल्वे नेटवर्क मार्ग क्रमांक 2 वर ही रेल्वे इमारतीच्या आतमधून धावते.
2004 मध्ये सुरुवात
चोंगकिंग रेल ट्रांझिट चीनच्या चोंगकिंगची सार्वजनिक मेट्रो यंत्रणा आहे. चोंगकिंग रेल ट्रांझिट लिमिटेड कॉर्पोरेशनकडे त्याचे संचालन आहे. 6 नोव्हेंबर 2004 रोजी त्याची सुरुवात झाली. चीनच्या वेगवेगळ्या भागात विस्तारलेल्या मोनो रेल्वे मार्गावरील क्रमांक दोन याचे खास वैशिष्ट्य आहे. येथे धावणारी मोनोरेल चीनच्या पश्चिम भागातील शहराची पहिली मेट्रो आहे.
यामुळे रुळाला दिला आकार : सिचुआन खोर्याच्या आग्नेय भागातील चोंगकिंग भाग, वुशान, वुलिंग आणि डाओउन पर्वतांनी तिन्ही बाजूंनी घेरला आहे. येथील बहुतांश वसाहती डोंगरावर आहे. त्यामुळे याला माउंटन सिटी नावानेही ओळखले जाते. या भौगोलिक स्थितीमुळे रेल्वेमार्गाला असा आकार देणे भाग पडले.
इंटरनेटवर टीका : जोखमीच्या रेल्वेमार्गामुळे इंटरनेटवर बरीच टीका होत आहे. याव्यतिरिक्त अनोख्या रेल्वे मार्गाला काहींनी पसंती दर्शवली आहे.