आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये बाजारात ट्रकमधून फेकले डझनावर बॉम्ब; 31 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या मुस्लिमबहुल शिजियांग प्रांतात गुरुवारी इस्लामी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. दोन ट्रकमध्ये बसून आलेल्या दहशतवाद्यांनी युरुम्की शहराच्या मध्यवर्ती गजबजलेल्या बाजारात डझनभर बॉम्ब फेकले. शक्तिशाली डझनावर स्फोटकांच्या या धमाक्यात 31 ठार, तर 90 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांना जबर शिक्षा करण्यात येईल, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या सरहद्दीनजीक या प्रांतात यिगूर मुस्लिमांची संख्या अधिक आहे.

युरुम्की शहरातील रेनमीन पार्क भागात मध्यवस्तीत भाजी बाजार भरतो. सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी बाजारात प्रचंड गर्दी होती. अचानक दोन मालमोटारी गजबजलेल्या बाजारात घुसल्या. चालकाशेजारी बसलेल्या हल्लेखोरांनी स्फोटके काढून भरबाजारात फेकली. बॉम्ब रस्त्यावर पडताच पाठोपाठ धडाधड स्फोट झाले. त्यात स्फोटकांनी भरलेल्या एका ट्रकचाही प्रचंड मोठा धमाका झाला. स्फोटांच्या मालिकेमुळे लोक सैरावैरा धावत सुटले.

दहा मिनिटांत पोलिस हजर
स्फोटाचे वृत्त कळताच दहा मिनिटांत पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्या वेळी प्रचंड धुराचे लोट निघत होते. रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता. जखमी विव्हळत रस्त्यावर पडले होते. बाजारातील अनेक दुकाने, भाजीपाला फेरीवाल्यांच्या गाड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. पोलिसांनी बाजाराकडे जाणाºया सर्व रस्त्यांवर कडे केले. रस्त्याच्या तोंडावर रुग्णवाहिका तैनात केल्या. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकामागोमाग स्फोट
रस्त्यावर अचानक स्फोटांचे आवाज आले. स्फोटांनी कानठळ्या बसत होत्या. दहा-बारा स्फोट झाले असावेत. ट्रकमध्ये बसलेले लोक बॉम्ब फेकत होते, असे एका जवळच असलेल्या व्यापाºयाने सांगितले.

दहशतवाद्यांनी मोड्स ऑपरेंडी बदलली
आतापर्यंत यिगूर दहशतवादी चाकू-सुºयांनी हल्ला करत होते. आता मात्र स्फोटकांसोबतच कारबॉम्बचाही वापर करण्यात येतो आहे. गेल्या महिन्यात एका रेल्वेस्थानकावर हल्ला करण्यात आला होता. त्यात 3 ठार आणि 79 लोक जखमी झाले होते. ‘गंभीर दहशतवादी हल्ला’ असे गुरुवारच्या हल्ल्याचे वर्णन चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने केले आहे.

भारताकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
नवी दिल्ली : चीनमधील दहशतवादी हल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादास भारताचा विरोध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. युरुम्की येथील स्फोटात ठार झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वनही भारताने केले आहे.