बीजिंग- अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असल्याचे वक्तव्य जपानने केले. यावर चीनने तीव्र नाराजी व्यक्त करून जपानवर प्रखर टीका केली आहे. जपानने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी चीनने केली. अशा वक्तव्यांना चीन गांभीर्याने घेतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग लेई यांनी म्हटले आहे. १७ रोजी भारतात आलेले जपानचे परराष्ट्रमंत्री फुमियो किशिदा यांनी ‘अरुणाचल भारताचे अभिन्न अंग’असल्याचे वक्तव्य केले .
होते.
जपान अरुणाचलमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक का नाही, असा प्रश्न किशिदा यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी ‘अरुणाचल भारताचे अविभाज्य राज्य असून सध्या तरी तेथे गुंतवणुकीस जपान उत्सुक नसल्याचे म्हटले होते.’
चीन नाराज का ? चीन अरुणाचल प्रदेशचा उल्लेख दक्षिण तिबेट नावाने करतो. हा चीनचाच प्रदेश असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या प्रवक्त्याने म्हटले, ‘भारत-चीनदरम्यानच्या वादग्रस्त प्रदेशात जपान कोणतीही दखल देणार नसल्याचे आश्वासन पूर्वीच जपानने दिले आहे. जपानने हे जाहीररीत्या दिलेले आश्वासन असूनही परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान आक्षेपार्ह आहे.’