आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला भारतासोबत हवा प्राचीन ‘सिल्क रोड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - पंतप्रधान ली किकियांग यांच्या भारत दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर चीनने मैत्रीचे आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चीनला भारतासोबतचे व्यापार संबंध दृढ करण्याची इच्छा आहे. त्यासाठी दक्षिण आशियातील विशिष्ट देशांना जोडणार्‍या ‘सिल्क रोड’ योजनेवर चीनने फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. भारत भेटीनंतर त्यास अधिक चालना मिळाली आहे.

साऊथ एशिया एक्स्पो सध्या कनमिंग येथे सुरू आहे. युनान प्रांताच्या राजधानीतील या व्यापारविषयक समारंभात चिनी अधिकार्‍यांकडून यासंदर्भातील संकेत देण्यात आले. भारतासह दक्षिण आशियातील व्यापारी सेतूचे प्रमुखपद चीनला स्वत:कडे ठेवण्याची इच्छा या व्यापार परिषदेतून व्यक्त झाली. त्यासाठी ‘साउदर्न सिल्क रोड’च्या कल्पनेवर नव्याने विचार करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. चीन, भारत, बांगलादेश, म्यानमार यांच्यात आर्थिक, व्यापारी आणि जनतेच्या पातळीवरील संबंध दृढ होण्यासाठी बीसीआयएमच्या वतीने यंदा कार रॅली आयोजित करण्यात आली होती.

प्राचीन व्यापारी मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव

भारताची भूमिका काय ?
चीनची ही योजना भारताच्या मदतीशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. म्हणूनच चीनने भारताचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. चीन, भारत, म्यानमार, बांगलादेश (बीसीआयएम) हे योजनेतील प्रमुख सदस्य असतील. या मार्गाने युनान ते भारत जोडले जाणार आहेत. इकॉनॉमिक कॉरिडोरच्या निर्मितीसाठी गेल्या महिन्यात पंतप्रधान ली यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा केली होती.

काय आहे सिल्क रोड ?
चीनच्या चेंगडू शहरातून या व्यापारी कल्पनेला सुरुवात झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. चीनमधून हा मार्ग भारत, बांगलादेश आणि नंतर मध्य-पूर्वेपर्यंत पोहोचला होता, असे मानले जाते. हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. सध्या व्यापाराचे सोळा आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत. त्याशिवाय हा नवीन प्रकल्प जागतिक व्यापारासाठी फायदेशीर ठरू शकतो, असा विश्वास अधिकार्‍यांना वाटतो.

कसा असेल मार्ग ?
चीन-व्हिएतनाम महामार्ग, चीन-लाओस-थायलंड महामार्ग, चीन-म्यानमार महामार्ग, चीन-भारत महामार्ग अशी वाहतुकीने जोडणार्‍या जाळ्याची योजना आहे. अनेक प्रकारची उत्पादने या मार्गाने वेगवेगळ्या देशांतील बाजारपेठांत नेण्यात येतील. त्यामुळे व्यापाराचा मार्गाचा अधिक विस्तार होईल.