आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताबरोबरच्या मैत्रीसाठी चीनचा पाच कलमी कार्यक्रम; संबंध सुधारू - जिनपिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतासोबत मैत्रीचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. उभय देशांतील सरहद्दीचा वाद सुटणे सोपी गोष्ट नाही, परंतु हा वाद सुटेपर्यंत सरहद्दीवर शांतता आणि स्थैर्य कायम ठेवून त्याचा मैत्रीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

59 वर्षीय जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष, लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतासोबत मैत्री वृद्धिंगत करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 'ब्रिक्स'देशांच्या आगामी शिखर परिषदेत पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेण्यासही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. उभय देशांची संयुक्तपणे सुमारे 250 कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे विकसनशील देशांचे हक्क आणि हित जपण्यासाठी भारत आणि चीनने विविध पातळ्यांवर एकत्रितपणे काम केले पाहिजे. चीनच्या दृष्टीने भारतासोबत मैत्री ही सर्वात महत्त्वाची आहे. भारतीय वृत्तसंस्था पीटीआयसह जगभरातील निवडक प्रसारमाध्यमांशी केलेल्या खास वार्तालाप कार्यक्रमात जिनपिंग यांनी भारतासोबतच्या विविध मुद्दय़ांवर नव्या सरकारचे धोरण स्पष्ट केले.

सर्वमान्य तोडगा निघेलच- सरहद्दीचा वाद ऐतिहासिक आहे. तो सोडवणे सोपी गोष्ट नाही, परंतु संवाद, सल्लामसलत सुरू राहिल्यास उभयपक्षी मान्य होईल, असा योग्य तो तोडगा निघेलच. वाद प्रलंबित असेपर्यंत सीमेवर शांतता कायम राखून आपण एकत्रित काम केले पाहिजे, असे जिनपिंग म्हणाले.

सरहद्दीचा वाद काय आहे- भारताचा 4 हजार किलोमीटर सरहद्दीचा वाद आहे, परंतु चीनच्या मते हा वाद केवळ 2 हजार कि. मी. र्मयादेपर्यंतच आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा प्रदेश नाही, असा चीनचा दावा आहे. अरुणाचलचा उल्लेख ते दक्षिण तिबेट असा करतात.

ब्रिक्स शिखर परिषद सोमवारपासून- ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) या देशांची शिखर परिषद येत्या सोमवारी, 25 मार्चपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणारी ही परिषद दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात होणार असून पंतप्रधान मनमोहनसिंग, जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनही सहभागी होणार आहेत.

सहकार्य व समन्वय
भारत-चीनने सामरिक संवाद कायम ठेवावेत आणि उभय देशातील संबंध योग्य मार्गावर ठेवावेत.

एकमेकांच्या शक्तिस्थळांचा वापर करून पायाभूत सुविधा, गुंतवणूक व इतर क्षेत्रात सहकार्य वाढवणे.

सांस्कृतिक संबंध बळकट करून दोन्ही देशांतील मैत्री सातत्याने वृद्धिंगत करण्यात यावी.

जागतिक आव्हानांचा मुकाबला करताना विकसनशील देशांचे हित व हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर सहकार्य व समन्वय ठेवावा.

एकमेकांबद्दल वाटत असलेल्या मुख्य चिंता समजून घ्याव्यात आणि समस्या, मतभेदांचे निराकरण करावे.