आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने जुना मित्र उत्तर कोरियाची साथ सोडली, नाव न घेता दिला अप्रत्यक्ष इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग/लंडन- स्वत:च्या स्वार्थासाठी आशियात कोणालाही अराजक माजवू दिले जाणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा चीनने उत्तर कोरियाला दिला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राष्ट्रांची दीर्घकाळापासून मैत्री आहे. आशियामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्व देशांनी योगदान द्यावे, असे आवाहन करत चीनचे नवे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी हा इशारा दिला आहे.
उत्तर कोरियाच्या चिथावणीखोर धमक्यांमुळे आशियात निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शी म्हणाले की, कोणालाही स्वार्थ साधण्यासाठी आशियातच नव्हे तर संपूर्ण जगात अराजक माजवू दिले जाणार नाही. एखाद्या देशाने स्वत:च्या हिताचे रक्षण करत असताना अन्य देशांचे न्याय्य हितही लक्षात घेतले पाहिजे, असे जिनपिंग यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता सांगितले. बोर्ड फोरम फॉर एशियाच्या (बीएफए) बैठकीत जिनपिंग यांनी चीनची भूमिका विशद केली. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड आणि अन्य नऊ राष्ट्रांचे प्रमुख या बैठकीला हजर आहेत. कंपनी व्यवहार मंत्री सचिन पायलट हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासह 1500 हून अधिक बिझनेस लीडरही या बैठकीत सहभागी झाले आहेत.

काय बोलले?
लोकांना लाभ मिळतो तेव्हा हवा आणि सूर्यप्रकाशाप्रमाणेच शांतता क्वचितच लक्षात येते, परंतु आपल्यापैकी कोणीही त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही. राष्ट्र छोटे असो की मोठे, सामर्थ्यशाली असो की दुबळे, श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकानेच शांतता कायम राखण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. एकमेकांच्या प्रयत्नांना खोडा घालण्याऐवजी सामूहिक विकासासाठी एकमेकांची कामे पूर्ण करायला हवीत, स्वत:च्या स्वार्थासाठी कोणालाही आशियाच नव्हे तर संपूर्ण जगात अराजक माजवू देणार नाही.

का असे बोलले?
उत्तर कोरिया हा चीनचा जुना मित्र आहे. परंतु 2011 मध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून उत्तर कोरियाचे नवे शासक किम जोंग उन हे चीनच्या प्रभावापासून पद्धतशीरपणे दूर जात असल्याचे चिनी प्रशासनाला वाटते. तीन वर्षांपासून चीनचा आर्थिक विकासदर घसरला आहे. त्यातच उत्तर कोरियाविरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी अमेरिका चीनवर दबाव टाकत आहे. बेटावरून चीनचे जपानशी मतभेद सुरू आहेत. दक्षिण-पूर्व आशियातील देशांशी दक्षिण चिनी सागरावरून चीनचा वाद सुरू आहे, तर भारताशी सीमावाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांना आशियात स्थैर्य व शांतता महत्त्वाची वाटू लागली आहे.

अमेरिकेची क्षेपणास्त्र चाचणी स्थगित
कोरियन बेटांवर वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुढच्या आठवड्यात कॅलिफोर्नियात घ्यावयाची आंतरखंडीय क्षेपणास्त्राची नियोजित चाचणी पुढे ढकलली.

जपान सज्ज
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जपाननेही तयारी केली असून आपल्या प्रदेशाच्या दिशेने येणारे उत्तर कोरियाचे कोणतेही क्षेपणास्त्र पाडण्याचे आदेश लष्कराला देणार आहे. यासंबंधीचे आदेश संरक्षणमंत्री टुसुनोरी ओनोडेरा हे येत्या दोन दिवसात देऊ शकतात.