आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China's Ex minister Sentenced To Death For Graft, Power Misuse

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्‍या माजी रेल्‍वेमंत्र्यांना भ्रष्‍टाचारप्रकरणी मृत्‍यूदंडाची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - भ्रष्टाचार व अधिकारांच्या गैरवापर केल्याप्रकरणी चीनचे माजी रेल्‍वे मंत्री लिऊ झिजून यांना मृत्‍यूदंडाची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे. स्‍थानिक न्‍यायालयाने हा निर्णय दिला. लिऊ यांच्‍यावर गेल्‍या 25 वर्षांमध्‍ये सुमारे 10.53 दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्‍याचा आरोप होता.

लिऊ हे 2003 ते 2011 या काळात रेल्वेमंत्री होते. या काळात देशातील विविध भागांना हाय स्‍पीड रेल्वेद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चीनने हाती घेतला होता. मृत्युदंडाच्या शिक्षेसोबतच लिऊ यांचे सर्व राजकीय हक्क काढून घेण्‍यात आले आहेत. तसेच त्‍यांची संपूर्ण मालमत्ता जप्‍त करण्‍याचे आदेशही देण्‍यात आले आहेत. मृत्युदंडाच्या शिक्षेचा दोन वर्षांनी न्यायालयीन आढावा घेतला जाणार आहे.

चीनचे नवे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांनी भ्रष्‍टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलणार असल्‍याचे जाहीर केले होते. नव्‍या धोरणानुसार भ्रष्‍टाचा-यांना कठोर शिक्षा ठोठावण्‍याचे सुतोवाच त्‍यांनी केले होते. त्‍यानुसारच ही कठोर शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे.

रेल्वेमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी लिऊ यांना 10 वर्षे तुरुंगवासाचीही शिक्षाही सुनावण्यात आली आहे. लिऊ यांनी 1986 ते 2011 या कालावधीत रेल्‍वेशी सबंधित विविध पदांवर असताना गैरवापर केला. पदाचा गैरवापर करुन त्‍यांनी 11 जणांना लाभ मिळवून दिला. त्‍यात विविध कंत्राटदारांचा समावेश आहे. लिऊ यांच्याबरोबरच इतरही अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.