हाँगकाँग - लोकशाही समर्थकांच्या आंदोलनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. चिनी सरकारने नागरिकांवर
स्मार्टफोनच्या अॅपद्वारे बारीक नजर ठेवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर आंदोलकांच्या नेत्यांवर सरकारने दबाव वाढवला असून तत्काळ आंदोलन मागे न घेतल्यास ‘भयंकर परिणामांना’ सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
कम्युनिस्ट पक्षाने हा इशारा दिला आहे. सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘पीपल्स डेली‘मधून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेउंग चुन-यिंग यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर सर्व सरकारी इमारती ताब्यात घेण्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात चिनी कम्युनिस्ट पक्षाचा संयम सुटत चालल्याचे पीपल्स डेलीमधील संपादकीयामधून दिसून आले आहे. सरकार येथे पोलिसांची मोठी कुमक आणेल.