बीजिंग - चीनच्या संसद परिसरातील भव्य ‘ग्रेट हॉल ऑफ पीपल’मध्ये सोमवारी ऐतिहासिक बैठक झाली. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. स्वराज यांचे भव्य स्वागत तर झालेच, शिवाय
आपल्या भारत दौर्यात पंतप्रधान
नरेंद्र मोदींशी केलेल्या सहकार्य करारांच्या अनुषंगाने दोन्ही देशांनी ठोस पावले उचलली असल्याचे जिनपिंग म्हणाले. आपल्या भारत दौर्यानंतर चीन-भारत संबंधांचे नवे पर्व सुरू झाले असल्याचे जिनपिंग यांनी नमूद केले. यावर स्वराज यांनीही या दौर्यातील काही ठळक आठवणी सांगितल्या. दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
मानसरोवर : सिक्कीममार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी दुसरा मार्ग खुला करण्याच्या दृष्टीने भारत-चीनमध्ये करार झाला असून यासंबंधीच्या दस्तऐवजांची देवाणघेवाण स्वराज यांच्या या चीन दौर्यात करण्यात आली. यामुळे अत्यंत कठीण मानली जाणारी ही यात्रा सोयीची होणार आहे.
भारावलेले जिनपिंग : आपल्या भारत दौर्यातील अनेक आठवणींनी जिनपिंग अजूनही भारावलेले आहेत. मोदी सरकार व भारतीय नागरिकांनी केलेले आदरातिथ्य, गुजरातमध्ये त्यांचे झालेले भव्य स्वागत व लोकांचे प्रेम या आठवणी अजूनही ताज्या असल्याचे जिनपिंग यांनी स्वराज यांना सांगितले.
नव्या मैत्रीपर्वाचा झाला प्रारंभ
चीनच्या राष्ट्रपतींनी एखाद्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याचे एवढ्या भावनिक पातळीवर स्वागत करावे हे चिनी इतिहासात प्रथमच घडत आहे. कोणताही प्रोटोकॉल न पाळता त्यांनी स्वराज यांच्याशी चर्चा केली. यावरून त्यांना भारताशी हवी असलेली मैत्री व आगामी काळातील भारताबद्दलचे धोरण याचीच साक्ष पटते, असे तज्ज्ञांना वाटते.
भारतात परतताल तेव्हा शुभेच्छा कळवा...
गेल्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान स्वत: माझ्यासोबत होते. तुम्ही चीन दौरा आटोपल्यावर परतताल तेव्हा राष्ट्रपती मुखर्जी आणि पंतप्रधान मोदी यांना माझ्या शुभेच्छा कळवा. - शी जिनपिंग
चिनी नववर्षानिमित्त मोदींनी शुभेच्छा पाठवल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या चिनी नववर्षानिमित्त (लुनार इयर ऑफ लिप) शुभेच्छा पाठवल्या आहेत. - सुषमा स्वराज
पुढे वाचा, मोदींच्या दौर्याबद्दल उत्सुकता...