आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची ब्रह्मपुत्रेवर तीन धरणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये आणखी तीन धरणे बांधण्याचा निर्णय चीनने परस्पर घेतला आहे. यापूर्वी चीनने या नदीवर एक धरण बांधलेले असून आणखी तीन धरणे बांधण्याचा निर्णय भारताला अंधारात ठेवून घेण्यात आला आहे.
दागू, जियाचा आणि जिएझू या तीन ठिकाणी ही धरणे बांधण्यात येणार आहेत. चीनच्या कॅबिनेटने त्याला गेल्या बुधवारी, 23 तारखेला मंजुरी दिल्याचे भारतीय अधिका-यानी सांगितले. चीन सरकारच्या कॅबिनेट कमिटीच्या दस्तऐवजात या तीन धरणांचा उल्लेख असून त्याचा तपशील देण्यात आलेला नाही. केवळ 12 व्या पंचवार्षिक योजनेत ही धरणे उभारण्यात येतील एवढाच ओझरता उल्लेख आहे. या धरणांमुळे भारतात विशेषत: अरुणाचल प्रदेश व आसाममध्ये महापूर येण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे या धरणांच्या बांधकामाबाबत भारताला कल्पनाही देण्यात आलेली नाही, असे अधिका-यानी स्पष्ट केले. धरणांच्या योजनेबद्दल चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला छेडले असता त्याने अधिक तपशील दिला नाही. नदीच्या वरच्या आणि खालच्या पात्रातील देशांच्या हिताच्या दृष्टीने वैज्ञानिक पातळीवर अभ्यास केल्यानंतरच नव्या प्रकल्पाला मंजुरी दिली जाते, असे तो म्हणाला.

प्रवाहात फरक नाही
नदीच्या प्रवाहात व्यत्यय येणार नाही अशा रीतीने प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहातही बाधा येणार नाही, असा दावा चीनने केला आहे.

पाणी वाटपाबद्दल चर्चा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौ-यात पाणी वाटपाबद्दल चीनचे सल्लागार दाई बिंगुओ यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली, पण नव्या धरणांच्या योजनेबद्दल चीनने चकार शब्दही काढला नाही.