लाहोर- पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पवित्र कुरानाचा अनादर केल्याप्रकरणी (ईशनिंदा) संतप्त जमावाने एका खिश्चन दाम्पत्याची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर दोघांचे मृतदेह वीट भट्टीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाहोरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोट राधा किसन गावात मंगळवारी (4 नोव्हेंबर) ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्याची ओळख पडली असून शमा आणि शहजाद अशी दोघांची नावे होती. शमा आणि शहजाद या दाम्पत्याने पवित्र कुरानचा अनादर (ईशनिंदा) केल्याने संतप्त जमावाने दोघांवर हल्ला चढवला. त्यात शमा आणि शहजादचा घटनास्थळी मृत्यु झाला. नंतर जमावाने दोघांचे मृतदेह धगधगत्या वीट भट्टीत फेकून दिले.
पंजाब सरकारने स्थापन केली चौकशी समिती....
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी या हत्याकांडची गंभीर दखल घेतली आहे. फास्ट ट्रॅक चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानात पवित्र कुरानचा अवमान हा गंभीर गुन्हा मानला जातो. दोषी आढळणार्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते. पाकिस्तानच्या संविधानात याप्रकरणी विशेष कायदाही बनवण्यात आला आहे. काही घटनांमध्ये तर पोलिस घटनास्थळी पोहोचण्यासाठीच संतप्त लोक दोषींना मृत्युदंडाची शिक्षा देतात.
मागील काही वर्षांपूर्वी खिश्चन महिला आसिया बीबी प्रकरण चर्चेत आले होते. मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप आसियावर होता. आसियाचे एका मुस्लिम महिलेसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. यादरम्यान आसियाने मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध अपशब्द काढले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील एका कोर्टाने नोव्हेंबर, 2010 मध्ये आसियाला दोषी ठरत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
दुसरीकडे, गेल्या जानेवारी महिन्यात मानसिक रुग्ण असलेल्या एका ब्रिटिश व्यक्तीला ईशनिंदाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या महिन्यात एका सुरक्षा रक्षकाने तुरुंगात त्याची गोळ्या घालून हत्या केली होती.