आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआयएच्या दोषी तपास अधिकाऱ्यांवर खटले भरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - ९/११ नंतर सीआयएने तपासाच्या नावाखाली ताब्यात घेतलेल्या संशयितांची अमानुष पद्धतीने चौकशी केली, त्यांचा छळ केला, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोषी तपास अधिकाऱ्यांवर खटले दाखल करा, अशी मागणी संयुक्त राष्ट्राने अमेरिकेकडे केली आहे. दरम्यान, सिनेटमध्ये यासंबंधीचा अहवाल बुधवारी सादर झाला.
जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेली धोरणे ही तपासाच्या सर्व आचारसंहितेचा भंग करणारी होती, हे स्पष्ट होत असल्याचे संयुक्त राष्ट्राचे विशेष प्रतिनिधी बेन एमर्सन यांनी म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल केले पाहिजेत. सीआयएने गुन्हेगारी कृत्य केले आहे, असा आरोप मानवी हक्क निगराणी संस्थेचे प्रमुख केनेथ रोथ यांनी केला आहे. दुसरीकडे तपास संस्थेने वापरलेल्या पद्धती चुकीच्या असल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी अगोदरच म्हटले आहे. यातून देशाच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधाला धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात ही पद्धत ठेवली जाणार नाही.
म्हणूनच लादेनचा ठावठिकाणा लागला : सीआयए
अमेरिकी गुप्तहेर संस्था सीआयएने आपल्या तपास पद्धतीचे समर्थन केले आहे. संशयिताना आमच्या पद्धतीने विचारपूस केली म्हणूनच अल-कायदाचा म्होरक्या आेसामा बिन लादेनचा ठावठिकाणा मिळाला, असा दावा सीआयएने केला आहे. तपास पद्धतीवरील सिनेटमधील अहवालावर संस्थेने ही प्रतिक्रिया दिली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी चौकशीची कठोर पद्धती अवलंबली; परंतु त्यामुळे दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे कट उघडकीस आणण्यास मदत झाली. संशयितांचा कटातील सहभाग स्पष्ट होऊ शकला. त्याचबरोबर दहशतवाद्यांचे इतर मनसुबेही उजेडात आले. त्यातून असंख्य निष्पाप नागरिकांचे प्राण वाचू शकले, असे सीआयएने बुधवारी म्हटले आहे. संशयितांच्या चौकशीत अबू अहमद अल कुवेतीबद्दलची अति महत्त्वाची माहिती आम्हाला मिळू शकली. कुवेती लादेनला माहिती पुरवणे आणि लादेनचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचा. यातूनच पुढे लादेनपर्यंत पोहोचता आले. अमर अल-बलूची याला सुरुवातीला पकडण्यात आले होते.
१०० जणांची चौकशी
बुश यांच्या कार्यकाळातील या प्रकरणाचा अहवाल ६ हजार पानांचा आहे, परंतु यातील केवळ ४८० पानेच गोपनीयतेच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत. सीआयएने त्या वेळी १०० संशयितांना पकडून त्यांची चौकशी केली होती. त्यात पाण्यात डोके बुडवणे, १८० तास झोपू न देणे यासारखे अमानुष प्रकार करण्यात आले होते. १०० जणांना अनेक महिने हा छळ सहन करावा लागला होता.