ओसामाच्‍या शोधासाठी अमेरिकेने / ओसामाच्‍या शोधासाठी अमेरिकेने राबविली होती लसीकरण मोहिम

वृत्तसंस्‍था

Jul 12,2011 09:16:18 AM IST

इस्‍लामाबाद-

अमेरिकेचा मोस्‍ट वॉन्‍टेड गुन्‍हेगार आणि अल कायदाचा म्‍होरक्‍या ओसामा बिन लादेन याचा डीएनए घेण्‍यासाठी अमेरिकेने प्रयत्‍न केले होते. यासाठी अमेरिकेने एक बोगस लसीकरण मोहिम राबविली होती. एबोटाबाद शहरात लादेन राहत होता त्‍या परिसरात ही मोहिम राबविण्‍यात आली होती. कोणाला संशय येऊ नये म्‍हणून शहरातील मागसलेल्‍या भागातही ही मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्‍यात आली होती. यासाठी अमेरिकेची गुप्‍तचर संस्‍था सीआयएने शकील आफ्रिदी नावाच्‍या एका वरिष्‍ठ डॉक्‍टरची नियुक्‍ती केली होती. या मोहिमेतूनच लादेनच्‍या ठावठीकाण्‍याची खात्री पटली अथवा नाही, याबाबत दुजोरा मिळालेला नाही. लादेनवर कारवाई करण्‍याच्‍या काही दिवस आधी मे महिन्‍यात ‘हिपेटायटीस बी’ची लसीकरण मोहिम राबविण्‍यात आली होती. आफ्रिदी यांनी एबोटाबादच्‍या मागासवर्गीय भागातून लसीकरणाला सुरुवात केली होती. परंतु, लादेनच्‍या मृत्‍यूनंतर आयएसआयने डॉ. आफ्रिदी यांना अटक केली आहे. अमेरिकेच्‍या गुप्‍तचर संस्‍थेला मदत करण्‍याचा त्‍यांच्‍यावर आरोप आहे.
पाकिस्‍तानने केलेल्‍या या कारवाईमुळे अमेरिका चिंतेत आहे. डॉ. आफ्रिदी यांच्‍या जीवाला धोका असण्‍याचीही भीती अमेरिकेला आहे. सीआयएकडे लादेनच्या बहीणीचा डीएनए उपलब्‍ध होता. या लसीकरण मोहिमेतून लादेनच्‍या कोणत्‍याही एका मुलाच्‍या रक्‍ताचा नमुना मिळण्‍याची सीआयएला आशा होती. लसीकरण मोहिमेच्‍या आधी डॉ. आफ्रिदी हे अफगाण सीमेजवळ खैबर भागात होता. मार्चमध्‍ये ते एबोटाबादला गेले. तिथे आरोग्‍य विभागाच्‍या काही कर्मचाऱ्यांना त्‍यांनी लाच देऊन या मोहिमेत सहभागी होण्‍यास तयार केले. यापैकी काही कर्मचाऱ्यांनी लादेनला पोलिओचा डोस पाजला होता. एक नर्स लादेनच्‍या घराच्‍या आवारात गेली होती. पंरतु, तिला डीएनए नमुना मिळाला की नाही, याबाबत दुजोरा मिळालेला नाही. लादेनच्‍या मृत्‍यूनंतर आयएसआयने चौकशी करुन डॉ. आफ्रिदी यांना अटक केली. परदेशातील गुप्‍तचर संस्‍थेला मदत करणाऱ्या व्‍यक्‍तीला कोणता देश अटक करणार नाही, असा मुद्दा एका पाकिस्‍तानी अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

X
COMMENT