आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cia Used Pakistani Centre For Abusing The Prisoners

सीआयएकडून कैद्यांचा पाकिस्तानी केंद्रांत छळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - 9/11 च्या हल्ल्यानंतर अफगणिस्तानात सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी लढाईवेळी अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएने अनेक कैद्यांचा छळ केल्याचा आरोप एका अहवालात करण्यात आला आहे.या छळासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कराचीसह इतर केंद्रांचा वापर करण्यात आला, असा दावा या अहवालात करण्यात आला असून हा अहवाल पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कन्या अमृतसिंग यांनी केला आहे.

अमृतसिंग या ओपन सोसायटी इनिशिएटिव्ह या अमेरिकेतील संस्थेच्या वरिष्ठ विधी सल्लागार आहेत. राष्ट्रीय संरक्षण आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या सदस्या आहेत. या संस्थेच्या वतीने हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अल-कायदाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेला 50 देशांचा पाठिंबा होता. आयएसआयने सीआयएसाठी कराचीतील एक केंद्र उपलब्ध करून दिले होते. त्या ठिकाणी कैद्यांची झडती घेतल्यानंतर त्यांना इतरत्र तुरुंगात हलवण्याचे काम केले जात होते. ही प्रक्रिया अगोदर आयएसआयकडून चालवली जात होती; परंतु दहशतवादविरोधी लढाईत मात्र त्याचे नियंत्रण सीआयएकडे आले होते. अमेरिका आणि ब्रिटिश गुप्तहेर अधिकारी त्यात अग्रेसर होते. अमेरिका चौकशीच्या माध्यमातून करत असलेल्या अशा गुप्त हिंसाचारात अनेक देश सहभागी आहेत. डझनावर देशांनी अमेरिकेला साथ देत हिंसाचार घडवून आणला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघनही केले आहे. हिंसाचाराची व्याप्ती आफ्रिका, आशिया, ऑ स्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, अफगाणिस्तान, कॅनडा, इजिप्त, जर्मनी, इराण, लिबिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, श्रीलंका, ब्रिटनपर्यंत पसरली आहे.

इतर देशांतही चौकशी केंद्र
पाकिस्तानात पकडण्यात आलेल्या संशयितांना इतर देशांत हलवून तेथील गुप्त ठिकाणी त्यांची चौकशी करण्याची पद्धतही सीआयएने अवलंबली होती. याचाही पर्दाफाश अहवालातून करण्यात आला आहे. त्यात थायलंड, रोमानिया, पोलंड, लिथुनिआ, डेन्मार्क या देशांचा समावेश आहे. त्यासाठी सीआयएने हवाई मोहिमा राबवल्या.

कायद्याची ऐशी की तैशी
संशयित कैद्यांना एका देशातून दुस-या देशात पाठवण्याची मोहीम राबवताना अमेरिकेने कायद्याचा अजिबात मुलाहिजा बाळगला नाही. त्यांनी ज्या कैद्यांची परदेशातून नेऊन चौकशी केली त्याचा अधिकृत आकडाही अहवालातून देण्यात आला आहे.

काय आहे अहवाल ?
‘ग्लोबलायझिंग टॉर्चर : सीआयए सिक्रेट डिटेन्शन अँड एक्स्ट्राऑर्डिनरी रेंडिशन’ असे शीर्षक असलेला अहवाल पंतप्रधानांच्या कन्या अमृत सिंग यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी अमेरिकेची सर्वोच्च गुप्तहेर संस्थेच्या गुप्त हालचालींचे पुरावे मांडले आहेत. या मोहिमेत 54 देशांनी त्यांना साथ दिली. सीआयएने पाकिस्तानात जाऊन तेथील 136 लोकांची चौकशी केली. त्यांना इतरत्र पाठवले. त्यांना कोठे पाठवायचे याचाही निर्णय सीआयएकडून घेण्यात आला होता, असे अहवालात म्हटले आहे.

चौकशी आणि छळ
आपल्या भूमीचा वापर इतर देशांना करू दिला जाणार नाही, असे पाकिस्तानने अनेक वेळा म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र सीआयएने आयएसआयच्या चौकशी केंद्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला. या केंद्रामध्ये संशयित लोकांना पकडून आणले जात असे. तपासणी केल्यानंतर अशा संशयितांचा छळदेखील केला जात होता. त्यांना शारीरिक त्रास दिला जात होता, असा दावाही अमृत सिंग यांनी केला.