आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआयएचा खाक्या जाहीर होणार, सुरक्षा वाढवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अल-कायदाच्या विरोधात अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएच्या आक्षेपार्ह तपास पद्धतीसंबंधीचा अहवाल जाहीर होणार असल्याने जगभरातील राजदूत कार्यालयांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिनेटच्या अहवालात सीआयएचे खरे स्वरूप बाहेर येणार असल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. अहवाल जाहीर झाल्यानंतर ‘मोठा धोका’ निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

सीआयएचा अहवाल जाहीर झाल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पाहायला मिळू शकतात, असा इशारा परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानंतरही सरकारने सीआयएसंबंधीचा अहवाल सिनेटमध्ये मांडण्याचे ठरवले आहे. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळातील सीआयएची वर्तणूक यातून स्पष्ट होणार असल्याने राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी त्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. २००९ मध्ये ओबामा सत्तेवर आले. तेव्हापासून ते सीआयएच्या ‘छळा’चा विषय टाळत आले. त्यावर अनेक वेळा मीडियातूनही टीका झाली होती.

छळाच्या अशा पद्धती
नाकातून पाण्याचा मोठा प्रवाह सोडणे, अतिशय कठीण वाटणा-या स्थितीत बसवणे, थापडा मारणे, बर्फात ठेवणे, झोपू न देणे इत्यादी. ९ / ११ चा मास्टरमाइंड खालिद शेख मोहंमद, अबू झुबायदाह, अब्द अल-राहिम अल नसरी यांच्यावर नाकात पाणी सोडण्याची अघोरी तपास पद्धत वापरण्यात आली होती.

४८० पानांचा अहवाल मांडला जाणार
६,००० पानांचा अहवाल आतापर्यंत गुप्त

ऑगस्टमध्ये अहवाल फुटला : सीआयएच्या आक्षेपार्ह तपास पद्धतीबद्दलचा तपास अमेरिकेच्या न्याय विभागाकडून करण्यात आला होता; परंतु विभागाने आरोप फेटाळले होते. मात्र, नंतर मानवी हक्क अधिकार संघटनांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला.

प्रकरण काय आहे ?
अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्राच्या जुळ्या इमारतींवर ११ सप्टेंबर २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने अल-कायदाच्या १०० संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर चौकशीदरम्यान अमानुष पद्धतींचा अवलंब केला होता. त्यासंबंधीचा हा अहवाल आहे.