आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption Issue To Resonate Among Indians In The Elections: Gallup Poll

बहुतांश नागरिक म्हणतात, सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - बहुतांश भारतीय नागरिकांच्या मते त्यांच्या सरकारमध्ये सगळीकडे मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार फोफावला आहे. अनेकांना असेही वाटते की, भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी सरकारने विशेष असे काही प्रयत्नही केले नाहीत. अमेरिकेची कंपनी गॅलपने केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

गॅलपच्या या सर्वेक्षणानुसार 2013 मध्ये 18 ते 34 वयोगटातील तीन चतुर्थांश भारतीय तरुणांना असे वाटते की, देशातील सरकारमध्ये सगळीकडे मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार पसरलेला आहे. तसेच 35 ते 54 वर्षे वयोगटातील 76 टक्के आणि 55 वर्षांपुढील 72 टक्के ज्येष्ठांचे मतही असेच आहे. विशेष म्हणजे नुकताच प्रकाशझोतात आलेला आम आदमी पार्टी हा पक्ष प्रामुख्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर लढा देत आहे. या सर्वेक्षणासाठी ऑक्टोबर 2013 च्या दरम्यान 3000 लोकांशी चर्चा करण्यात आली.

27 टक्के समाधानी, 40 टक्के नाराज
पूर्वेकडील राज्यांत नागरिक मात्र अर्थव्यवस्थेबाबत आशादायी असल्याचे दिसून आले. येथील 52 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वेक्षणानुसार 2013 मध्ये केवळ 27 टक्के भारतीयांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कामगिरीवर समाधान, तर 40 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली. उत्तर भारतात 14 टक्के लोकांनीच मनमोहनसिंग यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. 2012 मध्ये मात्र 38 टक्के जनता त्यांच्या कामगिरीवर समाधानी होती.

सर्वेक्षणानुसार उत्तर भारतीयांच्या तुलनेत दक्षिण भारतीय आर्थिक परिस्थितीबाबत अधिक सकारात्मक आहेत. 38 टक्के दक्षिण भारतीयांच्या मते देशाची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. तर सुमारे निम्म्या (45 टक्के) लोकांच्या मते अर्थव्यवस्था ठप्प झाली असून, तिची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे दक्षिण भारतातही काँग्रेसला निवडणुकीतील प्राबल्य टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. तेथे पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात. सर्वेक्षणानुसार कृषी क्षेत्राच्या मंदावलेल्या स्थितीमुळे उत्तर भारतीयांना मोठय़ा संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सर्वेक्षणातही त्याची झलक दिसून आली. उत्तर भारतातील केवळ 9 टक्के जनतेने अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत समाधान व्यक्त केले आहे. 65 टक्के जनतेने याच्या अगदी म्हणजे अर्थव्यवस्था मंदीकडे चालल्याचे मत व्यक्त केले आहे.