आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Dismissed Yingluck Shinawatra From The Post Of Prime Minister

थायलंडच्या पंतप्रधान शिनवात्रा बडतर्फ, निवत्तुमरोंग बुनसोंगपायसन काळजीवाहू पंतप्रधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडच्या पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांना पदाचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात संवैधानिक न्यायालयाने दोषी ठरवत बुधवारी बडतर्फ केले. त्यांच्यासोबतच त्यांच्या नऊ मंत्र्यांनाही दोषी ठरवून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
थायलंडमधील या मोठय़ा राजकीय घडामोडीनंतर उपपंतप्रधान निवत्तुमरोंग बुनसोंगपायसन यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले आहे. संवैधानिक न्यायालयाचे न्यायमूर्ती चारून इंताचान यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिला. सप्टेंबर 2011 मध्ये घाईगडबडीत असंवैधानिक रितीने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख थाविन प्लीनर्शी यांची बदली करण्यात आली. ही बदली करताना पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांनी पदाचा दुरुपयोग केला. या निर्णयात शिनवात्रा यांच्या नऊ मंत्र्यांनीही सक्रिय भूमिका निभावली, असे न्यायालयाने हा निर्णय सुनावताना म्हटले आहे. मंगळवारी शिनवात्रा यांनी न्यायालयात हजर राहून आपण निदरेष असल्याचे सांगितले होते. आपण हे प्रकरण उपमंत्र्याकडे सोपवले होते, त्यामुळे या प्रकरणात आपली काहीही भूमिका नसल्याचा युक्तिवाद शिनवात्रा यांनी केला होता.

यिंगलूक म्हणाल्या, मी पंतप्रधान नाहीच
आपला पंतप्रधानपदाचा दर्जा संपुष्टात आला आहे. आता आपण पंतप्रधान नसल्यामुळे या प्रकरणात सुनावणी करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा युक्तिवाद शिनवात्रा यांनी न्यायालयात केला. पण न्यायालयाने तो ग्राह्य धरला नाही. शिनवात्रा यांनी सभागृह विसजिर्त केले तेव्हा त्यांचा पंतप्रधानपदाचा दर्जा संपुष्टात आला नव्हता, तो कायम होता. त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहिले, त्यामुळे न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करू शकते, असे न्यायमूर्तींनी म्हटले.

नेमके काय घडले होते?
पंतप्रधान झाल्यानंतर यिंगलूक शिनवात्रा यांनी सप्टेंबर 2011 मध्ये तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख थावीन प्लीनर्शी यांना पदावरून हटवले होते. त्यांच्याऐवजी तत्कालीन पोलिसप्रमुखांची नियुक्ती केली आणि आपल्या नातेवाइकाची पोलिस प्रमुखपदी वर्णी लावली होती. मार्चमध्ये थायलंडच्या सर्वोच्च् प्रशासकीय न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवत प्लीनर्शी यांना पुन्हा पदस्थ केले होते.

बहीण-भावाची हकालपट्टी
यिंगलूक या माजी पंतप्रधान थकसीन शिनवात्रा यांच्या बहीण आहेत. थकसीन हे दूरसंचार क्षेत्रातील मोठे उद्योगपती आहेत. 2006 मध्ये त्यांना लष्कराने पदच्युत केले होते. तेव्हापासून थकसीन भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी स्वत:होऊनच परदेशात राहत आहेत. यिंगलूक यांचे सरकार थकसीन यांच्याच इशार्‍यावर चालते, असा विरोधकांचा आरोप आहे.
शिनवात्रा बडतर्फ झाल्या तरी त्यांच्या सर्मथकांनी गुलाबपुष्प देऊन पाठिंबा दर्शवला.