बंगळुरू- अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीच्या शानदार नाबाद 115 धावांच्या बळावर कर्नाटकने
इराणी ट्रॉफीच्या दुसर्या दिवशी शेष भारत संघाविरुद्ध आघाडी घेतली. दुसर्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी रणजी चॅम्पियन कर्नाटकने 5 बाद 390 धावा काढून आपली स्थिती मजबूत केली आहे. तत्पूर्वी रविवारी शेष भारताचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला होता.
बिन्नीचे हे प्रथम र्शेणीतील आठवे शतक आहे. त्याने 107 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 115 धावा ठोकल्या. कर्नाटककडे आता एकूण 189 धावांची निर्णायक आघाडी झाली आहे. त्यांच्या पाच विकेट अद्याप शिल्लक आहेत.
कर्नाटकने सकाळी 1 बाद 35 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कालचा नाबाद फलंदाज के. राहुल 35 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या कालच्या स्कोअरमध्ये 7 धावा जोडल्या. राहुलला अनुरितसिंगने त्रिफळाचित करून शेष भारताला यश मिळवून दिले. राहुल बाद झाला त्यावेळी कर्नाटकच्या 75 धावा झाल्या होत्या. गणेश सतीशने चौथ्या क्रमांकावर आलेल्या मनीष पांडेच्या मदतीने कर्नाटकचा डाव सावरला. दोघांनी तिसर्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. पांडे 36 धावा काढून पंकजसिंगचा बळी ठरला. त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार मारले.
गणेश सतीशचे अर्धशतक
एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसर्या टोकाने गणेश सतीशने अर्धशतक ठोकले. गणेश सतीश 84 धावा काढून बाद झाला. त्याने 180 चेंडूंचा सामना करताना 11 चौकारांसह ही खेळी केली. हरभजनसिंगने त्याचा अडथळा दूर केला. गणेश सतीश चौथ्या गड्याच्या रूपाने बाद झाला त्या वेळी कर्नाटकच्या 188 धावा झाल्या होत्या.
नायर-बिन्नीचा तडाखा :
गणेश सतीश बाद झाल्यानंतर कर्नाटकचा डाव लवकर आटपेल, असे वाटत होते. मात्र, नंतर करुण नायर आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी सामन्याचे चित्र बदलले. दोघांनी जबरदस्त फलंदाजी करताना शेष भारताची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 187 धावांची शतकी भागीदारी केली. करुण नायरचे शतक थोडक्याने हुकले. तो 92 धावा काढून बाद झाला. पंकजसिंगने त्याला त्रिफळाचीत केले. नायरने 161 चेंडूंत 12 चौकार मारले. दुसर्या टोकाने स्टुअर्ट बिन्नीने वनडे स्टाइल फलंदाजी करून शेष भारतावर दबाव वाढवला. बिन्नीने तीन उत्तुंग षटकार खेचून 14 सणसणीत चौकार मारले. त्याने 107.47 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. शेष भारताकडून पंकजसिंगने 2, तर अशोक डिंडा, अनुरितसिंग व हरभजनसिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शेष भारत पहिला डाव 201.
कर्नाटक पहिला डाव धावा चेंडू 4 6
उथप्पा झे. जाधव गो. डिंडा 00 05 0 0
के. राहुल त्रि. गो. अनुरितसिंग 35 63 7 0
गणेश सतीश झे. जाधव गो. भज्जी 84 180 11 0
एम. पांडे झे. कार्तिक गो. पंकज 36 47 7 0
करुण नायर त्रि. गो. पंकज 92 161 12 0
स्टुअर्ट बिन्नी नाबाद 115 107 14 3
मुरली गौतम नाबाद 06 29 0 0
अवांतर : 22. एकूण : 98 षटकांत 5 बाद 390 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-0, 2-7, 3-136, 4-188, 5-375. गोलंदाजी : अशोक डिंडा 23-5-93-1, पंकजसिंग 23-6-78-2, अनुरितसिंग 21-5-78-1, अमित मिश्रा 14-2-56-0, हरभजनसिंग 14-2-56-1, अपराजित 3-1-11-0.