आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crimea News In Marathi, Russia, Vladimir Putin,Divya Marathi

क्रिमिया रशियात होणार विलीन, सार्वमतानंतर पुतीन यांची वटहुकुमावर स्वाक्षरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी क्रिमियाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा बहाल करणा-या वटहुकुमावर स्वाक्षरी केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या भवनातील सूत्रांनी ही माहिती दिली. स्वाक्षरी झालेल्या दिवसापासूच हा वटहुकूम अमलातही आला आहे.


तत्पूर्वी अमेरिका आणि युरोपीय संघाने युक्रेन आणि रशियाच्या 21 अधिका-यांविरुद्ध प्रवास निर्बंध लादून त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. रविवारी घेण्यात आलेल्या सार्वमतानंतर क्रिमियाने युक्रेनमधून वेगळे होऊन रशियात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर युरोपीय संघाने ब्रुसेल्समध्ये परराष्ट्रÑमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. काही दिवसांत आणखी कडक पावले उचलण्यात येतील, असे लिथुआनियाचे परराष्ट्रमंत्री लायनस लिंकेवीक यांनी ट्विट करून सांगितले. मतदान केलेल्यापैकी 97 टक्के मतदारांनी रशियामध्ये सहभागी होण्याच्या बाजूने मतदान केले होते. ज्या अधिका-यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत, त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. क्रिमियामध्ये सार्वमत घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या अधिका-यांवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत, असे मानण्यात येते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच क्रिमिया रशिया समर्थक लष्कराच्या ताब्यात होता. ज्या सैनिकांच्या ताब्यात क्रिमिया आहे, त्यांच्यावर रशियाचे कोणतेही थेट नियंत्रण नसून ते रशिया समर्थक स्वसंरक्षक सैन्य असल्याचे रशियाने म्हटले आहे. क्रिमिया नेहमीच रशियाचा भाग राहिला आहे, असे क्रेमलिन या रशियन संसदेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे.


युक्रेन, अमेरिकेसह युरोपीय संघाने निर्णय फेटाळला
का उद्भवले राजकीय संकट?
युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून धरणे, निदर्शने आणि हिंसक चकमकी सुरू आहेत. त्यामुळे 22 फेब्रुवारी रोजी व्हिक्टर यानुकोविच यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतरच क्रिमियाचे राजकीय संकट उद्भवले.


तातारा समुदायाचा बहिष्कार
क्रिमियातील तातारा समुदायाच्या लोकांनी सार्वमतावर बहिष्कार टाकला होता. रशियामध्ये सहभागी झाल्यामुळे आपले जीवन अजूनच यातनामय होईल, असे त्यांचे म्हणणे होते. क्रिमियात तातारा समुदायाची लोकसंख्या 12 टक्के आहे.


97 टक्के लोकांचा कौल
सार्वमतानंतर युक्रेनचे मुख्य निवडणूक अधिकारी मिखाइल मॅलिशेव यांनी सांगितले की, एकूण 83 टक्के लोकांनी मतदान केले. त्यापैकी 97 टक्के लोकांनी रशियात सहभागी होण्याच्या बाजूने कौल दिला. क्रिमिया युक्रेनचा कोणताही कायदा मानणार नाही आणि क्रिमियामध्ये असलेल्या युक्रेन सरकारच्या सर्व संपत्तीवर क्रिमियाचाच हक्क राहील, सोमवारी क्रिमियाच्या संसदेत मंजूर झालेल्या ठरावात म्हटले आहे.


युक्रेनने निष्कर्ष फेटाळले
क्रिमियाच्या संसदेने युक्रेनपासून स्वतंत्र होण्याची घोषणा करताना रशियामध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृत अर्ज केला. युक्रेनने सार्वमताचे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. दरम्यान, क्रिमियाच्या या निर्णयानंतर युक्रेनने आपल्या 40,000 राखीव सुरक्षा सैनिकांना ‘युद्धसदृश परिस्थिती’साठी अंशत: तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर रशियाला श्रीमंत राष्‍ट्रांच्या जी-8 या गटातूनही निलंबित करण्यात आले आहे.


सार्वमत अवैध
युक्रेन, अमेरिका आणि युरोपीय संघाने क्रिमियामध्ये घेतलेले सार्वमत आंतरराष्ट्रीय कायद्यान्वये अवैध असल्याचे म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेवरही या देशांनी टीका केली आहे. युक्रेनचे हंगामी अध्यक्ष ओलेक्झेंडर तुर्चीनोव यांनी क्रिमियात झालेले मतदान ‘खूपच मोठा विनोद’ असल्याचे म्हटले आहे. युक्रेन किंवा सभ्य जग हे मतदान कधीही स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.