आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिओ दि जानेरिओ - ब्राझीलमध्ये डॉक्टरच्या रूपात यमदूत पाहण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांच्या नशिबी आली आहे. रुग्णालयातील आयसीयूमधील बेड रिकामे करण्यासाठी चक्क 300 रुग्णांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आरोग्य मंत्रालयाच्या चौकशीतून उघड झाला आहे.
ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाच्या तपास अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला डॉक्टरला सात रुग्णांची हत्या केल्याप्रकरणी पकडण्यात आले होते. या महिला डॉक्टरने रुग्णालयात आयसीयूमधील बेड रिकामे करण्यासाठी सात रुग्णांच्या हत्या केल्या होत्या. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार येथील इव्हॅगिलिकल रुग्णालयात डॉ. व्हर्जिनिया सोरेस डिसुझा व त्यांच्या वैद्यकीय पथकाने प्रथम रक्तवाहिन्या शिथिल करण्याची औषधे रुग्णांना दिली व नंतर त्यांच्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी केला. सर्व रुग्णांचा मृत्यू एसपिक्सिया नावाच्या आजाराने झाला आहे. हे रुग्णालय दक्षिण ब्राझीलमध्ये क्युरिटिबा या शहरात आहे. डॉ. डिसुझा ज्या रुग्णालयाच्या इन्चार्ज होत्या, त्या ठिकाणाचा गेल्या सात वर्षांतील रुग्णांवरील उपचार व त्यांच्या मृत्यूचा डाटा चौकशी पथकाने ताब्यात घेतला आहे. त्यांच्या कार्यकाळात 300 रुग्णांचे मृत्यू हे वादात सापडले आहेत.
...तर सर्वात मोठा खटला
मुख्य तपास अधिकारी डॉ. मारिओ लोबॅटो यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त केसेसमधील पुरावे जमा केले आहेत. 300 केसेसची तपासणी सुरू आहे. डॉ. डिसुझा यांनी 300 रुग्णांची हत्या केल्याचे सिद्ध झाले तर तो जगातील सर्वात मोठा सीरियल किलर खटला ठरेल, असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. याआधी ब्रिटिश डॉ. हेरॉल्ड शिपमॅनवर 215 रुग्णांच्या हत्येप्रकरणी खटला चालवण्यात आला होता.
सात रुग्णांच्या हत्येप्रकरणी अटक
अटक करण्यात आलेल्या डॉक्टर डिसुझा या 56 वर्षांच्या असून त्या विधवा आहेत. त्यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून त्यांच्यावर सात रुग्णांच्या हत्येचा आरोप आहे. या डॉक्टरच्या हाताखाली काम करणारे तीन अन्य डॉक्टर, तीन नर्स व एका फिजिओथेरपिस्टवर हत्येच्या कामात मदत केल्याचा आरोप आहे. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार डॉ. डिसुझांच्या वायरटेपवरून लक्षात येते की, त्यांनी हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील आयसीयूमधील बेड लवकर रिकामे व्हावेत व ते इतरांना देऊन पैसे कमवण्यासाठी नियोजनबद्धरीत्या घडवून आणला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.